होमपेज › Kolhapur › दर्शन मंडपाला तांत्रिक मान्यता

दर्शन मंडपाला तांत्रिक मान्यता

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 03 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. दर्शन मंडपाच्या बांधकामाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्याचे महिन्याभरात टेंडर काढण्यात येणार आहे.

राज्य शासनाने 25 कोटी रुपयांच्या जोतिबा विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दर्शन मंडप, टॉयलेट कॉम्प्लेक्स आणि पार्किंगचे काम केले जाणार आहे. सात कोटी रुपये खर्चून दर्शन मंडप बांधण्यात येणार आहे. त्याच्या ‘सिव्हिल’च्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. दर्शन मंडपातील विद्युतीकरण आणि सीसीटीव्हीच्या कामांना अद्याप तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्याचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर करण्यात आला असून त्यालाही दोन दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात 3 कोटी 56 लाख रुपये खर्चून टॉयलेट कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. त्याच्या तांत्रिक मान्यतेचाही प्रस्ताव प्रलंबित आहेत. नगररचना विभागाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. उद्या, शुक्रवारी ही मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या कामासाठीही तांत्रिक मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांच्या येत्या महिन्याभरात निविदा काढल्या जातील. त्यानंतर प्रत्यक्ष कामालाही लवकर प्रारंभ होण्याची शक्यता असल्याचे देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी सांगितले.