Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Kolhapur › शिक्षक बदल्यांमध्ये अनियमिततेचा कळस!

शिक्षक बदल्यांमध्ये अनियमिततेचा कळस!

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 11:35PMसुळकूड : एम. वाय. भिकाप्पा पाटील

सन 2018-19 मधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांतर्गत अनियमिततेच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे त्यातील अनियमितता संपुष्टात आणण्यासाठी बदली प्रक्रिया पुनश्‍च राबविण्याशिवाय अन्य उपाय द‍ृष्टिक्षेपात नाही. साहजिकच बदल्यांचा घोळ 15 जूनपूर्वी मिटला नाही तर पहिले शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू होणे अशक्य असल्याचे चित्र समोर येत आहे. यंदा प्रथमच, जि. प. प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया शिक्षकांनी पोर्टलवर आपली माहिती भरून ‘खो’ पध्दतीने ऑनलाईन होणार होती. या पध्दतीत एखाद्या शिक्षकास द्यावयाचा ‘खो’ चुकला तर पुढील संपूर्ण बदली प्रक्रिया चुकीची ठरणार होती. त्यामुळे प्रशासनाने बदल्या संबंधीचे कामकाज अत्यंत काटेकोरपणे राबविणे आवश्यक होते; परंतु बदली प्रक्रिया सुरू करून त्या संबंधीचे आदेश देण्यापर्यंत सर्वच स्तरावर झालेला ढिसाळ कारभार पुढील अनियमिततेवरून स्पष्ट होत आहे.

समानीकरणाच्या रिक्‍त जागा जाहीरच नाहीतप्रशासनाने तालुकावार समानीकरणाद्वारे रिक्‍त होणारी पदे जाहीर केली नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी बदलीसाठी पोर्टलवर शाळा भरताना समानीकरणातील शाळा पसंती क्रमात दिल्या. त्यामुळे अशा शिक्षकांचे अनेक पसंतीक्रम वाया जाऊन ते विस्थापित झाले.संवर्ग 1 ते 4 च्या बदल्या एकाचवेळी केल्या दि. 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार टप्प्याप्रमाणे संवर्ग 1 नंतर संवर्ग 2 त्यानंतर बदली अधिकार पात्र शिक्षक व शेवटी बदलीपात्र शिक्षक या क्रमाने बदली प्रक्रिया राबविणे आवश्यक होते; परंतु त्याऐवजी एकाचवेळी सर्व टप्प्यातील बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे बहुतांश शिक्षकांना पसंतीक्रम देण्यासाठीं प्रत्येक टप्प्यावर रिक्‍त शाळांची नावे समजलीच नाहीत. साहजिकच त्यांचे बरेच पसंतीक्रम वाया जाऊन सोयीतील शाळा मिळणे हा ‘नशिबाचा खेळ’ ठरला. 
संवर्ग 1 मधील अनियमितता  संवर्ग 1 अंतर्गत येणार्‍या शिक्षकांना बदलीतून सूट असल्यामुळे; सेवाज्येष्ठता यादी तयार होण्यापूर्वी संबंधित प्रमाणपत्रांची तपासणी होऊन मगच या संवर्गाचा लाभ त्यांना देणे संयुक्‍तिक होते; पण तशी प्रक्रिया न राबविल्यामुळे काही शिक्षकांनी गैरफायदा घेऊन सूट मिळवली. परिणामी अनेक शिक्षकांचे ‘खो’ ने चुकून अनियमिततेत भर पडली.

संवर्ग 2 मधील अनियमितता 

जिल्ह्यातील 30 किलोमीटरपेक्षा परस्परापासून जास्त अंतरावर असलेल्या शासकीय व मान्यताप्राप्त संस्थेतील पती - पत्नींना या संवर्गातून बदलीस प्राधान्य आहे; परंतु काहींनी जोडीदार परजिल्ह्यात सेवेत असूनही या संवर्गाचा लाभ घेत बदली करून घेतली आहे. त्यामुळे पसंतीक्रमानुसार मागणी केलेल्या पात्र शिक्षकांवर अन्याय होऊन अनियमितता झाली आहे. 

संवर्ग 4 मधील अनियमितता 

अ) या संवर्गांतर्गत जिल्ह्यात 30 कि.मी. अंतरात सेवेत असणार्‍या पती - पत्नी शिक्षकांना एक युनिट मानून त्यांना बदलीने नियुक्‍ती देणेची आहे; परंतु बर्‍याच प्रकरणामध्ये पती - पत्नी पैकी एकाची बदली होणे व जोडीदार विस्थापित होणे किंवा दोघेही विस्थापित होऊन अनियमितता समोर आली आहे. 

ब) काही शिक्षकांनी या जिल्ह्यात नोकरी सुरू झाल्याची तारीख पोर्टलवर भरण्याऐवजी परजिल्ह्यात सुरू झालेल्या नोकरीची तारीख भरली आहे. त्यामुळे त्यांची सेवाज्येष्ठता वाढून, त्यांनी पसंतीनुसार सोयीची शाळा मिळविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठता असलेले शिक्षक विस्थापित झाले आहेत. 

क) शासन निर्णयानुसार, सेवाज्येष्ठ शिक्षकांकडून कनिष्ठ शिक्षकांस ‘खो’ बसण्याऐवजी उलटा प्रकार काही ठिकाणी घडला आहे. 
मंजूर पदांपेक्षा कमी - जास्त शिक्षकांना आदेश काही शाळांमधून मंजूर असलेल्या शिक्षक पदापेक्षा जादा तर काहींमधून गरजेपेक्षा कमी शिक्षकांच्या बदल्याचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे जादा झालेल्या शिक्षकांचा समावेश विस्थापितांत झाला आहे. 

अन्य गैरप्रकार 
काही शिक्षकांनी पती - पत्नी नोकरी ठिकाणामधील अंतर दूरच्या मार्गाने दाखवून तर काही पती - पत्नींनी जोडीदाराच्या सेवेस मान्यता नसतानाही बदल्या करून घेतल्या आहेत. तर काहींनी सुट्टीच्या नकाराधिकाराचा वापर करीत बदल्या टाळल्या आहेत. शिक्षक बदलीतील वरील सर्व अनियमितता विचारात घेता 31 मे 2018 पूर्वी बदली प्रक्रिया पार पाडणे अशक्य आहे. त्यासाठी सर्वच बदली प्रक्रिया सुरुवातीपासून पुनश्‍च राबविणे आवश्यक आहे. 15 जूनला प्राथमिक शाळांचे प्रथम सत्र सुरू होण्यापूर्वी शाळापूर्व तयारी, विद्यार्थ्यांना केंद्रस्तरावरून मोफत पाठ्यपुस्तक वितरण व वैयक्‍तिक वाटप, नवागतांचे स्वागत या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, अन्यथा शैक्षणिक सत्राच्या कामकाजावर अनिष्ट परिणाम होऊन जि. प. शाळांना येऊ घातलेल्या चांगल्या स्थितीलाही ते मारक ठरणार आहे.   
 
पदवीधर शिक्षक बदलीतील अनियमितता 

विषय शिक्षकांच्या पदवीचे मॅपिंग वस्तुनिष्ठ न झाल्याने, बदली प्रक्रियेत विषय शिक्षकांना ‘खो’ देताना विज्ञान विषयाच्या शिक्षकाने भाषा विषयाच्या शिक्षकास ‘खो’ देण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे विषय शिक्षकांमध्ये विस्थापितांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय बदली होऊनही विनंती बदलीचे आदेश ‘प्रशासकीय बदलीमुळे माझी बदली होत असेल तर बदलीचा प्राधान्यक्रम विचारात घ्यावा, असे विवरण पत्र घेऊनही बदल्यांच्या आदेशात मात्र या बदल्यांचा विनंती बदली म्हणून उल्‍लेख केला आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रशासकीय बदलीपोटी मिळणारा प्रवास व वाटचाल भत्ता व वाटचाल कालावधी यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.