होमपेज › Kolhapur › शिक्षकांचे प्रमाण 20 टक्क्यांनी घसरले?

शिक्षकांचे प्रमाण 20 टक्क्यांनी घसरले?

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 25 2018 12:06AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने कोल्हापुरातील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबविलेल्या शिक्षकांच्या बदली सत्राने महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रमाण निकषापेक्षा 20 टक्क्यांवर खाली घसरले आहे. हे प्रमाण निकषापर्यंत जाऊन पोहोचविण्याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाला रिक्‍त जागा भरण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील, अन्यथा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची एकूण दुरवस्था पाहता याचे गंभीर परिणाम वैद्यकीय महाविद्यालयाला भोगावे लागणार असून, यामध्ये विद्यार्थी प्रवेश संख्या घटण्याच्या धोक्याबरोबर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या मंजुरीचा प्रश्‍न अडगळीत जाण्याचा धोका असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात शिक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले होते. यामध्ये राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह 15 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यापैकी 6 शिक्षकांनी शासनाकडे आपले राजीनामे सादर केले. तर बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर अवघा एक शिक्षक रुजू झाला आहे. याचा परिणाम म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थापनेवर शिक्षकांचे प्रमाण मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार सुमारे 18 टक्क्याने खाली घसरले आहे. हे प्रमाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या मंजुरीसाठी चिंताजनक समजले जाते.

अशा शिक्षकांच्या घसरत्या प्रमाणामुळे काही वर्षांपूर्वी राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर पहिल्या वर्गाच्या विद्यार्थी प्रवेशाच्या 50 जागा गमाविण्याची वेळ आली होती. यानंतर शिक्षक भरतीत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या स्थानिक तरुणांनी सहभाग दर्शविल्यानंतर ही अस्थापना सुधारुन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून पूर्ववत प्रथम वर्गाच्या 150 विद्यार्थी प्रवेशाला मंजुरी मिळविण्यात यश मिळाले. आता गाडा सुरळीत चालला असताना बदली सत्र राबविण्यात आले. प्रशासकीय बाब म्हणून या बदल्यांवर आक्षेप घेण्याचे कोणतेच कारण नाही. पण वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षकांची जर अवस्था आणि बदली केलेले शिक्षक निघून जातात व नवे शिक्षक रुजू होत नाहीत हा अनुभव लक्षात घेता शासनाला हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे लागेल असा सूर या क्षेत्रातून उमटतो आहे. 

राज्य शासनाच्या पातळीवर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील बदल्या हा गंभीर विषय आहे. शिक्षकांनी सेवेत असताना खासगी व्यवसाय करू नयेत असा दंडक आहे. यासाठीच त्यांना भरपाई म्हणून गलेलठ्ठ पगार ही देण्यात येतात. तरीही या क्षेत्राकडे वैद्यकीय शिक्षण घेतलेले तरुण वळत नाहीत म्हणून महसूली बदल्यांप्रमाणे या बदल्या न करता आजपर्यंत या क्षेत्राला थोडा सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला होता. कायदा असूनही ‘गो स्लो’ असे संदेश खुद्द मंत्रालयातूनच धाडण्यात येत होते. यामागे वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी टिकविणे हा मुख्य हेतू होता. पण आता बदल्यांचे सत्र राबविण्यात आले आहे. यामध्ये पर्यायी व्यवस्थेची तितकीच खबरदारी घेण्याची जबाबदारी शासनावर आहे. नाहीतर 50 विद्यार्थी प्रवेशाला मुकावे लागू शकते. 

शाहू वैद्यकीय महाविद्यालयात काही महिन्यांपूर्वीच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे तपासणी पथक येऊन गेले होते. या पथकाने केलेल्या तपासणीत शिक्षकांच्या अस्थापनेवर 11 टक्क्यांची कमतरता असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. कौन्सिलच्या निकषानुसार 10 टक्क्यांची कमतरता दखल घेण्याजोगी असल्यामुळे वाढीव कमतरतेमुळे अपेक्षित  कारवाईचा बडगा वाचविण्यासाठी शासन स्तरावर कसरत करावी लागली होती. आता हे प्रमाण 20 टक्क्यांवर गेल्यामुळे विद्यार्थी प्रवेशाची कपात वाचविण्यासाठी शासनाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. 

अ‍ॅडव्हॉक पदोन्‍नतीचा प्रस्ताव

शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बदली सत्र आणि राजीनाम्यामुळे शिक्षकांच्या अस्थापनेवरील कमतरतेचे प्रमाण वाढल्यामुळे शासनाने प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांच्या रिक्‍त जागा भरण्यासाठी अ‍ॅडव्हॉक पदोन्‍नती देऊन मार्ग काढावा. तसेच अधिव्याख्यात्यांच्या रिक्‍त पदांसाठी बंधपत्रित उमेदवारांना प्राधान्य देऊन कमतरतेचे प्रमाण निकषामध्ये आणावे, असा प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी शासनाकडे पाठविल्याचे समजते.