Fri, Apr 26, 2019 03:50होमपेज › Kolhapur › आयटीआयमध्ये शिक्षकाने वीट मारल्याने विद्यार्थी जखमी

खळबळजनक; शिक्षकाने विद्यार्थ्याला वीट मारली!

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वर्गात मोबाईलवर गाणी ऐकणार्‍या विद्यार्थ्याशी वाद होऊन शिक्षकाने वीट फेकून मारल्याचा प्रकार घडला. यामध्ये अथर्व विजय गायकवाड (वय 18, रा. सानेगुरुजी वसाहत) जखमी झाला. आयटीआय आवारातील प्लम्बिंग वर्कशॉपजवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.

अथर्व गायकवाड दुपारी तास नसल्याने वर्गात गाणी ऐकत बसला होता. शिक्षक राज घोडके यांनी त्याला गाणी बंद करण्यास सांगितले.  मोबाईल काढून घेतला. या कारणावरून दोघांत वादावादी झाली. 

दोघे वर्गाच्या बाहेर आले. अथर्वला ढकलून दिल्याने तो खाली पडला. तसेच शेजारी पडलेली वीट शिक्षक राज घोडके यांनी फेकून मारल्याने तो जखमी झाला. ही घटना पाहणार्‍या विद्यार्थ्यांनी याची माहिती व्यवस्थापनाला दिली. इतर शिक्षकांनी अथर्वला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच अथर्वचे आई-वडील दवाखान्यात आले. शिक्षक राज घोडके हे तासिका तत्त्वावर आयटीआय येथे नेमणुकीला आहेत.

आयटीआयमध्ये प्लम्बर ट्रेंडसाठी थेअरीचे विषय मी शिकवतो. मी सकाळच्या पहिल्या सत्राचे तास घेत असताना, अथर्व तेथे आला. तो मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत होता. ती बंद करण्यास सांगितले. यावर ‘तुझा काही संबंध नाही, तू आमच्या बॅचला शिकवत नाही,’ असे तो उर्मट बोलला. तसेच मोबाईल काढून घेऊन त्यांच्या शिक्षकांकडे दिल्याच्या रागातून तो अंगावर धावून आला. त्यावेळी प्रतिकार केला असता तो खाली पडल्याने डोक्याला दुखापत झाली. आम्ही त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखलही केले, असे राज घोडके यांनी सांगितले.