Wed, Aug 21, 2019 20:08होमपेज › Kolhapur › शिक्षकांचे वर्ष गेले आंदोलनात!

शिक्षकांचे वर्ष गेले आंदोलनात!

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:22AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रवीण मस्के

शिक्षकांचा विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी, सामान्य गणित विषय बंदचा विद्यार्थ्यांना बसलेला फटका, कला, क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी करण्याचा निर्णय, वरिष्ठ व निवड श्रेणीचा जाचक आदेश करण्याचा निर्णय, विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे धोरण, गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीस उठबशा काढावयास लावल्याच्या प्रकरणामुळे गत वर्ष चर्चेत राहिले. वर्षभरात शिक्षक संघटनांची आंदोलने सुरूच राहिली तर नवे शैक्षणिक प्रश्‍न वाढले आहेत.

विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी घेऊन सरल प्रणालीत अपलोड करण्याच्या निर्णयाचा वर्षाच्या सुरुवातीस तीव्र विरोध होऊन शिक्षकांनी यावर बहिष्कार टाकला. राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर शासनावर आदेश मागे घेण्याची वेळ आली. सामान्य गणित विषय बंद करण्याचा निर्णय झाल्याने याचा हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला. शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच विद्यार्थी गणवेशाचे पैसे बँक खात्यात जमा करण्याचा नवीन निर्णय शासनाने घेतला. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. 

कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. याच्याविरोधातही आंदोलन झाले. शिक्षक रस्त्यावर उतरल्याने पुन्हा सरकारला तासिका पूर्ववत करण्याची नामुष्की पत्करावी लागली. ऑक्टोबर महिन्यात नव्याने काढण्यात आलेल्या जाचक वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीच्या आदेशामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात आजही शिक्षक संघटनांची आंदोलने सुरू आहेत. 

पायाभूत चाचणी यंदा उशिराने झाली. यातच मूल्यमापन चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका यू-ट्यूबर अपलोड करण्यात आल्याने खळबळ उडाली. मात्र, कोणावरही कारवाई झाली नाही. वर्षाच्या सुरुवातीपासून कायम विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरूच राहिले. जुलै महिन्यात आळंदी ते मुंबई सायकलवारी काढण्यात आला. नागपूर हिवाळी अधिवेशनावर दंडवत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शासनाने दखल घेत 1 व 2 जुलै रोजी घोषित शाळांना अनुदान देण्याचे जाहीर केले. 

कानूर बुद्रूक (ता. चंदगड) येथील नववीत शिकणार्‍या विजया चौगुले हिला गृहपाठ न केल्याने पाचशे उठबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिकेने दिली. यात तिची प्रकृती ढासळल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासनस्तरावरून या घटनेची गंभीर दखल घेतल्याने मुंबईत उपचारासाठी हलविण्यात आले. मुख्याध्यापिकेवर अटक होऊन कारवाई झाली. मात्र, या प्रकारामुळे शिक्षणक्षेत्र पुरते हदरले. 

शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘शाळासिद्धी’ मानांकनात जिल्ह्यातील 610 शाळांनी राज्यात अव्वल स्थान पटकाविले. स्वच्छ विद्यालय सहभागात कोल्हापूरने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या वर्षाभरातील दोन गोष्टी जमेच्या बाजू राहिल्या आहेत.

दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील 13 हजार शाळा बंद करून त्यामधील विद्यार्थी जवळील शाळेत स्थलांतरित करण्याचा धाडसी निर्णय सरकारने घेतला. यामुळे जिल्ह्यातील 34 हून अधिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे पायपीट करण्याची वेळ आली आहे.