Fri, Jul 19, 2019 07:25होमपेज › Kolhapur › तावडे हॉटेल परिसर अतिक्रमणप्रश्‍नी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक 

तावडे हॉटेल परिसर अतिक्रमणप्रश्‍नी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक 

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

तावडे  हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली.तावडे हॉटेल हा परिसर कोल्हापूरच्या मोक्याच्या ठिकाणी आहे. कोल्हापूरच्या नाक्यावर असलेली ही जागा वादात सापडली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक बांधकामे झाली आहेत. ही जागा आपल्या 
हद्दीत असल्याचे उचगाव ग्रामपंचायतीचे मत आहे. तर कोल्हापूर महापालिकेचे या जागेवर आरक्षण आहे. यासंदर्भातील वाद हा मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ही जागा कोल्हापूर महापालिकेची असल्याचा निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने या जागेवरील बांधकामे ही अनधिकृत ठरवून ती काढून टाकण्यासाठी कारवाई करण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेचे या जागेवर ट्रक टर्मिनन्स व कचरा डेपोचे आरक्षण आहे. मात्र, ही जागा आपल्या हद्दीत असल्याचा दावा करणार्‍या उचगाव ग्रामपंचायतीने यातील बांधकामांना परवानगी दिली आहे.  या सर्व प्रकरणात राज्य सरकारने आपला अहवाल न्यायालयातही सादर केला आहे.दरम्यान, या मोक्याच्या जागेवरील बांधकामांबाबत कारवाई होणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले. ज्यांनी या जागेवर बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे, त्यांनी कारवाईवेळी ही परवानगी दाखविली होती. त्याचप्रमाणे ज्यांनी बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केले आहे, त्यांच्यावर कारवाई होऊ नये, अशी मागणीही करण्यात आली होती.

जागेची मालकी कोणाची, यासंदर्भात नगरविकास विभागाने जो अहवाल दिला आहे त्याच्याआधारे मंगळवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.यासंदर्भात प्राथमिक चर्चा करून अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

Tags : Kolhapur, Tawde hotel, encroachment, meet, Chief Ministers