Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Kolhapur › तावडे हॉटेल परिसरात बांधकामे नियमित होणार

तावडे हॉटेल परिसरात बांधकामे नियमित होणार

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या मोक्याच्या जागेवरील तावडे हॉटेल परिसरातील बांधकामे नियमित करण्यासाठी सरकार अनुकूल आहे. न्यायालयाने जागेची मालकी कोणाची, याबाबत जो निर्णय दिला आहे, त्या तारखेपूर्वी ज्यांनी उचगाव ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन बांधकामे केली आहेत, ती पहिल्या टप्प्यात नियमित केली जातील. तर त्यानंतर झालेल्या बांधकामांबाबत दुसर्‍या टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

तावडे हॉटेलचा परिसर ही कोल्हापुरातील मोक्याची जागा आहे. त्या ठिकाणावर कोल्हापूर महापालिकेने कचरा डेपो व ट्रक टर्मिनन्सचे आरक्षण दाखविले आहे. मात्र, या जागेबाबत सुरुवातीपासून वाद होता. ही जागा आपल्या मालकीची असल्याचे सांगून या जागेवर बांधकामे करण्यासाठी उचगाव ग्रामपंचायतीने परवानग्या दिल्या आहेत. मात्र, या जागेवर कोल्हापूर महापालिकेने हक्क सांगितला होता. त्यावर मंगळवारी महसूलमंत्र्यांकडे बैठकही झाली होती.

या बैठकीत जागेच्या मालकीचाच मुद्दा प्रामुख्याने होता. याबाबतचा अंतिम निर्णय नगरविकास खात्याने घ्यावा व नगरविकासमंत्र्यांकडेच याची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरविकास विभाग हा मुख्यमंत्र्यांकडे असून, तेच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

याबाबत नगरविकास विभागाला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची ही जागा असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असला, तरी या निर्णयापूर्वी उचगाव ग्रामपंचायतीकडून ज्यांनी परवानगी घेऊन या जागेवर बांधकामे केली आहेत, त्यांची बांधकामे कशी नियमित करता येतील, त्याबाबतचा अहवाल नगरविकास विभागाकडून गेल्यानंतर त्याचा निर्णय पहिल्या टप्प्यात होईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर कोणी बांधकामे केली असल्यास त्याबाबत काय करायचे, याचा निर्णय दुसर्‍या टप्प्यात घेतला जाणार आहे.

कोल्हापूर महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयानंतर या ठिकाणची बांधकामे अतिक्रमण असल्याचा दावा करून ती काढून टाकण्यासाठी मोहीम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार यंत्रणाही तयार ठेवण्यात आली होती. मात्र, त्याला पोलिस बंदोबस्त नाकारण्यात आला. यापूर्वीच या  बांधकामांबाबत सरकारकडून गो-स्लोचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत.

महापालिका आरक्षणाचा लेखाजोखा 

कोल्हापूर महापालिकेने या जागेवर आरक्षण असल्याचा दावा केला आहे. मात्र, कोल्हापूर महापालिकेने नेमके किती जागांवर आरक्षण टाकले आहे?, ते कधीपासून टाकले आहे?, आरक्षण टाकल्यानंतर ती जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही किती कालावधीत करायची आहे? या सगळ्या प्रकाराचा लेखाजोखाही नगरविकास विभागामार्फत मांडला जाणार आहे. त्यामुळे आरक्षण टाकले तरी ती जागा आवश्यक असलेल्या मुदतीत ताब्यात घेतली  की नाही, हा मुद्दाही नगरविकास विभागाच्या अहवालात येणार आहे.

स्थगितीसाठी प्रयत्न

या जागेवरील बांधकामांना संरक्षण देण्याचा सरकारचा दृष्टिकोन स्वच्छ आहे. यापूर्वीच अतिक्रमण हटाव मोहिमेला पोलिस बंदोबस्त नाकारून व विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळातच गो-स्लोचे तोंडी आदेश देण्यात आल्याने सरकारची भूमिका स्पष्ट झाली आहे. तरीही कोल्हापूर महापालिकेने पुढील कारवाई करू नये, यासाठी स्थगिती आदेश मिळविण्यासाठी या  प्रकरणातील मंडळी मुंबईत तळ ठोकून बसली आहेत. याबाबत नगरविकास विभागाकडून स्थगिती आदेश मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Tags : Tawde hotel, Buildings, regular, kolhapur news