येळवणजुगाई : वार्ताहर
मागील चार महिन्यांपासून कासारी खोर्यात ठाण मांडून धुमाकूळ घालत असलेल्या टस्कर हत्तीने मोसम (सोस्टेवाडी), गजापूर कै, बुर्णेवाडी, मांजरे येथे ऊस पीक, केळीबाग यांचे नुकसान केल्यानंतर आता गावडी, कुंभवडे, शेंबवणे, धुमकवाडी, पंदारेवाडी या ठिकाणी रात्रभर ऊस व भात पिकांचा फडशा पाडला. बॅटरी किंवा वाहनांच्या लाईटचा उजेड दिसताच टस्करने अंगावर धावून येण्यास सुरुवात केली आहे. कासारी खोर्यातील शेतकरी भयभीत व चिंताग्रस्त झाले आहेत.
टस्कर हत्ती मे महिन्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील वाशी-पिसात्री येथून मोसम- अणुस्कुरा ते अगदी विशाळगड-गेळवडे येथील म्हातारपट या जंगल क्षेत्रात वास्तव्यास होता; पण आता मात्र त्याने गावडी ते मोसम या टप्प्यात तळ ठोकला आहे. धुमकवाडी येथील शेेतकरी गोरख कुंभार व विठ्ठल हाप्पे यांच्या शेतात मागील आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. दोघेही शेतकरी त्याला हाकलण्यास गेले असता. उजेडाच्या दिशेने धावून येण्यास सुरुवात केली व मोठ्याने चित्कार केला. शेतकर्यांनी प्रसंगावधान राखून बॅटरीचा उजेड बंद केला व ओढ्यात उड्या घेतल्या. परंतु, दोघांच्याही पायाला गंभीर मार लागला आहे. काही काळ दोघांच्या अंगाचा धरकाप उडाला होता. इतर शेतकर्यांच्या मदतीने त्यांना घरी आणावे लागले.
तसेच मागील दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी मोसम-मांजरे रस्त्यावरून मांजरे येथील शिक्षक महात, पाटील व येळवणजुगाईचे माजी सरंपच सत्यवान खेतल टेम्पोतून शाळेचे साहित्य घेऊन निघाले असता रात्री अचानक हत्ती उसातून बाहेर आला व उजेडाच्या दिशेने मोठ्याने चित्कार करून टेम्पोच्या दिशेने येऊ लागला चालकाने प्रसंगावधान राखून लाईट बंद केली व सर्वांनी टेम्पो तेथेच ठेवून आडमार्गाने पळ काढला. तसेच कुंभ्याचीवाडी येथील राम शेरे व अशोक नारकर गुरे चारण्यास जंगलात रासाई मंदिर परिसरात गेले असता गुरांना व माणसांना पाहून बिथरलेला हत्ती मोठ्याने चित्कार करू लागला व झाडे उपटून आक्रमक हालचाली करू लागला. सगळ्यांनी गुरे तेथेच सोडून घराकडे धाव घेतली.
वन विभागाची बघ्याची भूमिका
वन विभागास वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनसुद्धा त्यांनी टस्करला गांभीर्याने घेतलेले नाही. रात्री गस्तीस फक्त वनमजूर असतात. त्यांना फोन करूनसुद्धा ते तिकडे फिरकत नाहीत. विचारले असता आमच्याकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही फक्त हत्तीवर नजर ठेवण्याचे काम वरिष्ठांनी सोपवले आहे, असे सांगण्यात येते. सायंकाळी पाच वाजल्यानंतर या परिसरात तसेच रस्त्यावर जीव मुठीत धरून वावरावे लागते. या टस्करप्रश्नी शासन हे शेतकर्यांसाठी की वन्यप्राण्यासाठी, असा प्रश्न पडतो. आधीच अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी हत्तीने केलेल्या नुकसानीमुळे अधिकच अडचणीत आला आहे. हत्तीचा बंदोबस्त न केल्यास वन विभागाच्या कायार्र्लयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे मोसमचे सरपंच बाबासो मापूसकर यांनी सांगितले.