Fri, Apr 26, 2019 09:28होमपेज › Kolhapur › ताराराणीला महापौर, शिवसेनेला उपमहापौरपदाचा फॉर्म्युला?

ताराराणीला महापौर, शिवसेनेला उपमहापौरपदाचा फॉर्म्युला?

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 24 2018 12:27AMकोल्हापूर : सतीश सरीकर

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेने महापौरपद निवडणुकीत ताराराणी आघाडीला पाठिंबा द्यायचा आणि त्या बदल्यात भाजप-ताराराणी आघाडीने शिवसेनेचा उपमहापौर निवडून आणायचा, असा फॉर्म्युला तयार केला जात असल्याची चर्चा आहे. महापालिकेत सत्तांतरासाठी नाट्यमय घडामोडी घडवून आणण्यासाठी जोरदार हालचाली भाजप-ताराराणी आघाडीच्या गोटात सुरू असल्याचे सांगण्यात येते.  

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु, काटावरचे बहुमत आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिका पदाधिकारी निवडीत शिवसेनेची साथ घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद बहाल करण्यात आले आहे. परंतु, स्थायी समितीत शिवसेनेची ‘अत्यंत’ गरज असल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादीने परिवहन सभापतिपद दिले असल्याचे मत शिवसेना नगरसेवकांचे आहे. त्यामुळे महापौर किंवा इतर निवडणुकीवेळी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी ‘बांधील’ नसल्याचे शिवसेना नगरसेवक सांगत आहेत. शिवसेनेने आणखी पदांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभार्‍यांनी शिवसेना नगरसेवकांना फारशी ‘किंमत’ देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.  

विजयासाठी गणित...

काही महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘गाफील’ ठेवून भाजप-ताराराणी आघाडीने दणका दिला होता. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडून भाजपचा सभापती केला आहे. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीला याही निवडणुकीत काही तरी ‘चमत्कार’ होईल, अशी आशा आहे. त्यासाठी शिवसेनेशी ‘संधान’ बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजप-ताराराणी आघाडीला शिवसेनेने पाठिंबा दिल्यास हा आकडा 37 वर जातो. तसेच स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना जमेत धरल्यास 39 संख्या होते. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीतील आणखी फक्त दोन नगरसेवक फोडल्यास भाजप-ताराराणी-शिवसेनेची संख्या 41 आणि काँग्रेस-राष्ट्रवादी 40 वर जाईल, असे ‘गणित’ मांडले जात आहे. त्यासाठी खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आहे. 

गोवा, तारकर्ली, पुण्यात नगरसेवक...
 

काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतुष्ट नगरसेवकांना फोडण्यासाठी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला याची कुणकुण लागल्याने त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीतील असंतुष्ट शोधले आहेत. त्यांच्याशी संपर्क ठेवला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत काहीही घडू शकते, अशी स्थिती असल्याचे सांगण्यात येते. परंतु, काहीही झाले तरीही कोणाचा कुणावर विश्‍वास नाही, अशी परिस्थिती आहे. फुटीर नगरसेवकांवर सर्वाधिक ‘नजर’ ठेवली जात आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना ‘गोव्याला’ तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना ‘तारकर्लीला’ नेण्यात आले आहे. सर्वांचे फोन काढून घेऊन स्विच ऑफ केले आहेत. कोणत्याही नगरसेवकाचा कुणाशीही संपर्क होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेचे तीन नगरसेवक मात्र ‘पुण्यात’ आहेत. सर्वच पक्षांचे नगरसेवक गुरुवारी रात्री कोल्हापुरात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महादेवराव महाडिक यांच्या हाती सूत्रे

काही वर्षांपूर्वीपर्यंत कोल्हापूर महापालिकेवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ‘एकहाती’ सत्ता होती.  विरोधी पक्ष नावालाच होता. कालांतराने महाडिक यांचे महापालिकेवरील वर्चस्व संपुष्टात आले. आता तर पक्षीय वैर जगजाहीर आहे. परंतु, महाडिक व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे ‘राजकीय वैर’ संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महापालिकेत आता महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचा उमेदवार सतेज पाटील यांच्या उमेदवाराविरुद्ध महापौरपदाच्या निवडणुकीत उतरला आहे. महाडिक यांनी  निवडणुकीची ‘सूत्रे’हाती घेतल्याचे सांगण्यात येते. काही महिन्यांपूर्वी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी महाडिक यांनीच सूत्रे फिरवत ‘भाजपचा सभापती’ करण्यासाठी राष्ट्रवादीला खिंडार पाडले होते.

उत्तुरे, भोपळे यांच्या माघारीची शक्यता...

महापौर-उपमहापौरपदासाठी शुक्रवारी सकाळी निवडणूक होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसतर्फे शोभा बोंद्रे, ताराराणी आघाडीकडून रूपाराणी निकम व शिवसेनेतून प्रतिज्ञा उत्तुरे रिंगणात आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीतून महेश सावंत, भाजपचे कमलाकर भोपळे व शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांनी अर्ज भरलेले आहेत. भाजप-ताराराणी आघाडी व शिवसेनेची युती झाल्यास उत्तुरे व भोपळे हे माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकास एक लढत होईल, अशी चर्चा आहे.