Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Kolhapur › कुंपणाबाहेर या, संघटितपणे प्रगती साधा

कुंपणाबाहेर या, संघटितपणे प्रगती साधा

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रगती हवी असेल तर इच्छा बाळगा, नवनवी कला कौशल्ये आत्मसात करा, कष्टाची तयारी ठेवा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुंपन सोडून बाहेर या, एकट्याने संघर्ष करण्याऐवजी संघटितपणे प्रगती साधा असा कानमंत्र देत भविष्य घडवण्यासाठी आत्मविश्‍वासाच्या बळावर गगनात उंच भरारी घ्या, असे आवाहन जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी महिलांना केले. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे आयोजित पाच दिवसीय ताराराणी महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी झाले. त्यावेळी उद्घाटक म्हणून महाडिक बोलत होत्या. महापौर स्वाती यवलुजे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, पंचायत समिती सभापतींची उपस्थिती होती. प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर 3 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत भरलेल्या या महोत्सवात 180 बचतटांनी वस्तू व खाद्यांचे स्टॉल लावले आहेत. 

उद्घाटक म्हणून बोलताना अध्यक्षा महाडिक म्हणाल्या, महिलांमधील कलांचे आविष्कार पाहता हा महोत्सव नसून गुणोत्सव आहे असे मला वाटते. महिलांमध्ये हे उपजतच गुण असतात, त्यांना बाहेर आणण्यासाठी केवळ व्यासपीठाची गरज असते. ताराराणीच्या नावाने महोत्सव भरवून हे जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिले आहे. कोणतीही महिला अबला नसते तिचा फक्‍त आत्मविश्‍वास कमी पडतो हे सांगताना महाडिक यांनी स्वत:चे उदाहरण देताना मी पण एक साधी गृहिणी होते, माझा जगातील व्यवहाराशी संबंध नव्हता; पण अमल महाडिक आमदार झाल्यानंतर अचानकपणे संधी आली. मी सदस्य म्हणून निवडून आले, अध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर उभी राहिले; पण ती संधी मला माझ्या कर्तृत्वावरच मिळाली होती. माझ्यात काहीतरी आहे, हा विश्‍वास कुटुंबीयांना होता. प्रत्येक महिलेने आपल्यातील हा विश्‍वास समोरच्या माणसात तयार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी बचतगटांची सुरुवात आंध्रमध्ये झाली; पण महाराष्ट्राने त्याचे चळवळीत रूपांतर केले. किती विक्री झाली यापेक्षा मी विक्रीची किती कौशल्ये आत्मसात केली हे महत्त्वाचे आहे. बचतगटांनी महिलांना विश्‍वास देण्याबरोबर जीवनमान उंचावण्याचे काम केले असल्याचे सांगितले. मी स्वत: दरवर्षी सहकुटुंब महोत्सवात येतो, तुम्हीही सर्वांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले. महापौर स्वाती यवलुजे, जि.प. सदस्य अरुण इंगवले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप  यांनी मनोगत व्यक्‍त केले.

36 बचतगटांचा गौरव

शंभूमहादेव गट देवकांडगाव, रेणुका गट मडिलगे, लखमेश्‍वर गट गजरगाव (आजरा),  स्वामीसमर्थ गट तिसंगी, दत्तगुरू गट असळज, महालक्ष्मी गट बालेवाडी (गगनबावडा), राधाकृष्ण गट कोनवडे, जागृती महिला गट पाचवडे, अष्टविनायक गट आदमापूर (भुदरगड), साई महिला गट तेऊरवाडी, लक्ष्मीनारायण गट कालकुंद्री, उमाजी नाईक गट राजगोळी खुर्द (चंदगड), महालक्ष्मी गट हसूरचंपू, चेतना महिला गट कसबा नूल, ब्रम्हदेव गट कसबा नूल (गडहिंग्लज), सुरभी गट रेंदाळ, संकल्प सिद्धी गट इंगळी, सावित्रीबाई गट नवे पारगाव (हातकणंगले), समृद्धी गट लिंगनूर दुमाला माऊली गट पिंपळगाव खुर्द, महालक्ष्मी गट वंदूर (कागल), अंबिका गट वळिवडे, अहिल्यादेवी गट वसगडे, प्रज्ञाशिल गट वसगडे (करवीर), सरस्वती गट गोळीवडे, नवदुर्गा गट वाडी रत्नागिरी, माऊली गट माळवाडी (पन्हाळा), जिव्हेश्‍वर गट घोटवडे, संत गजानन गट कसबा तारळे, दत्त महिला गट खामकरवाडी (राधानगरी), मातोश्री गट भेडसगाव, श्रद्धा महिला सरूड, भैरवनाथ गट कोपार्डे (शाहूवाडी), प्रगती गट शिरढोण, मातोश्री गट दत्तवाड, माऊली गट अब्दुललाट (शिरोळ).