Fri, Jul 03, 2020 02:55होमपेज › Kolhapur › ‘बालकल्याण’मधील विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेचा संदेश

‘बालकल्याण’मधील विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेचा संदेश

Published On: May 18 2018 1:07PM | Last Updated: May 18 2018 1:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मन शांत ठेवून डोक्याने विचार करा, कोणालाही घाबरू नका, आपण कोठे चुकतो हे ओळखून स्वत:मधील क्षमता विकसित करा, उच्च ध्येय ठेवून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करा, असा आत्मनिर्भरतेचा संदेश बालकल्याण संकुलमधील विद्यार्थिनींना समुपदेशन शिबिरात मिळाला.

दै. ‘पुढारी’ संचलित ‘प्रयोग’ फाऊंडेशनतर्फे ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षणांतर्गत जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना कोल्हापूर (बालकल्याण संकुल) येथे गुरुवारी (दि.17) समुपदेशन कार्यक्रम झाला. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब वेलफेअर कमिटीच्या सदस्या व समुपदेशक सोनल जोशी यांनी ‘उडान एक भरारी’ या विषयावर विद्यार्थिनींसमवेत खास शैलीत संवाद साधत त्यांना बोलते केले. विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्‍वास जागृत करण्याचा प्रयत्न केला. जोशी म्हणाल्या, जीवनात पुढे जाताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. यशस्वी होण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. स्वत:मधील क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. काहीतरी वेगळे करायचे, हा ध्यास प्रत्येक विद्यार्थिनीने बाळगला पाहिजे. आयुष्यात कशा पद्धतीने मोठे व्हायचे, याचा आजपासूनच विचार करायला लागा, असे त्या म्हणाल्या.

चांगल्या गोष्टी सांगणारे खूपजण असतात. मात्र, आपण कोठे कमी पडतो ही सांगणारी माणसे सभोवताली असली तरच शंभर टक्के यश मिळविता येईल. सर्वांनाच सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. ध्येयापर्यंत पोहोचताना गांगरून जाऊ नका. यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा. स्वत:ला कमी लेखू नका. उद्याच्या उज्वल भारताचे नागरिक म्हणून देशासाठी उत्कृष्ट कार्य करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी बालकल्याण संकुलाचे अधीक्षक पी. के. डवरी, नजिरा नदाफ, द्रौपदी पाटील, कोल्हापूर कुराश असोसिएशनचे प्रशिक्षक शरद पवार आदी उपस्थित होते.

शिबिरामुळे आत्मविश्‍वास मिळाला...

बालकल्याण संकुलातील विविध वयोगटांतील विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फाऊंडेशनतर्फे समुपदेशन शिबिर घेण्यात आले. शिबिरामुळे वेगळा आनंद व आत्मविश्‍वास मिळाल्याची भावना विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावर दिसत होती.