Mon, Jun 24, 2019 17:19होमपेज › Kolhapur › #Women’sDayग्रामीण महिलांचे टॅलेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर 

#Women’sDayग्रामीण महिलांचे टॅलेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर 

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 12:13PMविजय पाटील, कोल्हापूर 

कुणाचं गाव डोंगराच्या कुशीत. तिथं दिवसातून एखादी एस.टी. बस कशीबशी जाईल अशी स्थिती. लाईट म्हणजे असली काय, नसली काय, अशा पद्धतीची. अशा आडवाटेच्या आणि सोयीसुविधा नसलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील खेड्यापाड्यातील अनेक मुलींनी जिद्दीने कर्तबगारी दाखवली. स्वकर्तृत्वावर आदर्शांची वाट निर्माण करून ठेवली. या रणरागिणींची जिद्द आणि मेहनतीला सलामच करायला हवा.

आंतरराष्ट्रीय नेमबाजीत कोल्हापूरच्या मुलींनी दबदबा निर्माण केला आहे. तेजस्विनी सावंत यांच्यापासून राही सरनोबत, राधिका बराले, अनुष्का पाटील अशी मोठी नामावली आहे. भारतीय महिला क्रिकेट (अ) संघाची अनुजा पाटील ही कर्णधार आहे. कुस्तीमध्ये रेश्मा माने हिने कोल्हापूरचं नाव चमकत ठेवलं आहे. बुद्धिबळामध्ये ऋचा पुजारीने निर्विवादपणा सिद्ध केला आहे. आय.टी.सारख्या क्षेत्रात अश्‍विनी दानीगोंड यांनी स्वत:चे साम्राज्य तयार केलं आहे. जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत यूपीएससीचा अभ्यास करत असलेली प्रियंका पाटील निवडणुकीत उतरली आणि जिंकली. मिनी आमदारकी म्हटल्या जाणार्‍या सभागृहात ती सदस्य म्हणून काम करत आहे. सांगलीमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मधुरा सिंहासने, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात स्मृती मानधना यांनी कर्तबगारीचा दबदबा तयार केला आहे. कुस्तीच्या मैदानात प्रतीक्षा बागडी हिने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चमक दाखवली आहे. यापुढे ती सहज आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल, असा तिचा खेळाचा ग्राफ सांगून जातो. सातार्‍यात ऑलिम्पिकपटू ललिता बाबर, धावपटू जनाबाई हिरवे यांच्या कर्तृत्वाने गगनाला गवसणी घातली आहे. ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. यासह अनेक क्षेत्रांत या परिसरातील मुली-महिला लक्षवेधी काम करत आहेत. देशाचं नाव उंचावत आहेत. 

कोल्हापूर, सांगली व सातारा हा दक्षिण महाराष्ट्राचा भाग म्हटला तर तसा अद्यापही ग्रामीण आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळूरसारख्या सोयीसुविधांचा इथं अभाव आहे. अनेक गोष्टींची कमतरता आहे; पण इथली माती मात्र खणखणीत आत्मविश्‍वास देणारी आहे. त्यामुळेच सोयीसुविधा नसल्याचा बाऊ न करता प्रत्येक क्षेत्रात इथल्या मुली-महिला विजयाची पताका फडकावत आहेत. आयएएस, आयपीएस, आयएफएस अशा सरकारी अधिकारी झालेल्या मुलींची संख्याही या परिसरात मोठी आहे. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंग्लंड, रशिया या देशांत शास्त्रज्ञ, डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या रणरागिणींची नामावलीसुद्धा दखल घेण्यासारखी आहे. सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणार्‍या महिलांनी तर कोल्हापूरसह आसपासच्या परिसराचे नाव जगाच्या नकाशावर ठळक करण्याचे काम केले आहे. संगीत, चित्रपट, नाटक या क्षेत्रांमध्येही या परिसराचा आता दबदबा तयार होऊ लागला आहे. दररोज विविध क्षेत्रांत आत्मविश्‍वासाने ओतप्रोत भरलेल्या मुली येऊ लागल्या आहेत. स्वत:चं टॅलेंट सिद्ध करत देशाचेही नाव उजळण्याचे काम अशांकडून सुरू आहे.