Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Kolhapur › तलाठी मगदूम पुन्हा लाच घेताना जाळ्यात

तलाठी मगदूम पुन्हा लाच घेताना जाळ्यात

Published On: Mar 15 2018 1:18AM | Last Updated: Mar 15 2018 1:09AM गडहिंग्लज : प्रतिनिधी

जरळी (ता. गडहिंग्लज) येथील सजाकडे कार्यरत असलेला तलाठी भीमराव मगदूम (मूळ रा. पिंपळगाव, ता. भुदरगड) याला दुसर्‍यांदा लाचलुचपतने पकडले. पाच हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले. 19 डिसेंबर 2014 रोजी गडहिंग्लज सजाकडे असताना याच मगदूम तलाठ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर निलंबनही करण्यात आले. त्यावेळी दाखल झालेल्या केसचा अद्याप निकाल लागला नसून मगदूम याला पुन्हा सजा देण्यात आल्यानंतर त्याने आपली खाबूगिरी सुरूच ठेवल्याने अखेर वैतागलेल्या शेतकर्‍याने त्याच्याविरुद्ध तक्रार करत त्याला पुन्हा  लाचलुचपतच्या हवाली केले.

मगदूम याच्यावर 2014 साली निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्याला पुन्हा महसूलच्या सेवेत घेण्यात आले व त्याची बदली चंदगड येथे करण्यात आली. चंदगडनंतर पुन्हा मगदूम हा गडहिंग्लज तालुक्यात आल्यानंतर त्याने जरळी सजाकडे काम सुरू केले. या ठिकाणीही मगदूम याची पैशाची हाव पूर्वीप्रमाणेच सुरू झाली होती. यामध्ये तक्रारदार असलेले फिर्यादी सावंत हे चन्‍नेकुप्पी येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन जरळी हद्दीमध्ये आहे.

सावंत व त्यांच्या शेजारी असलेल्या शिपुरे यांच्यामध्ये शेतजमिनीचा किरकोळ वाद होता. शिपुरे यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता पर्यायी रस्ता पाहिजे होता, त्याला सावंत यांनी विरोध केला होता.शिपुरे यांनी रस्ता मिळावा, यासाठी गडहिंग्लज तहसील कार्यालयाकडे सावंत यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. या दाव्यामध्ये शिपुरे यांच्याविरोधात निकाल देत त्यांचा अर्ज नामंजूर केला होता.
सावंत यांना पीक कर्ज नूतनीकरणासाठी आपल्या 351 व 352 गटनंबरचा सातबारा उतारा पाहिजे असल्याने त्यांनी तलाठी मगदूम याची भेट घेतली असता, मागे जमिनीच्या वादाच्या कामामध्ये मी तुमच्या बाजूने काम केले असून त्यापोटी मला 10 हजार रुपये द्या, मगच तुमचा उतारा देतो, अशी मागणी मगदूम याने केली. तक्रारदार सावंत यांनी याबाबत मगदूम याला वारंवार विनवणी करून सातबारा उतार्‍याची मागणी केली. मात्र, पैशाच्या हव्यासापोटी मगदूम याने त्यांना टोलवत आणले. मुळातच सावंत यांना मार्च अखेरीस याबाबतची कागदपत्रे द्यावयाची असल्याने त्यांनी विनवणी करूनही मगदूम याने टाळाटाळ केल्याने अखेर त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला.

तलाठी मगदूम याच्याबरोबर तडजोड करत पाच हजार रुपये देण्याचे कबूल केले. यानुसार आज सायंकाळी ओंकार मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या दारामध्ये मगदूम याने फिर्यादीकडे पाच हजारांची लाच स्वीकारताच लाचलुचपतच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, शरद पोरे, संदीप पावलेकर, रूपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.