शिरोळ : प्रतिनिधी
मौजे आगर (ता. शिरोळ) हद्दीतील प्लॉटच्या सात-बारापत्रकी नाव लावण्यासाठी शिरोळ व मौजे आगरचा तलाठी उमेश लक्ष्मण माळी याला मंगळवारी सायंकाळी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शिरोळ गावचावडी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
कुरूंदवाड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव चिंचवाडे यांनी मौजे आगर येथील गट नंबर 286 मधील 300 चौ.मी. खुला प्लॉट 2 फेबुवारी 2018 रोजी खरेदी केला आहे. सात-बारापत्रकी मुलाचे नाव लावण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रे तलाठी माळी याला दिली; पण नाव लावण्यासाठी माळी याने प्रथम दहा हजार रुपयांची मागणी केली. शेवटी सात हजारांत तडजोड झाली. एक हजार रुपये देऊनही माळी काम करण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे चिंचवाडे यांनी दि. 16 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मंगळवारी कोल्हापूर येथील लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांनी गावचावडी शिरोळ कार्यालयात सापळा लावला. तलाठी माळीला तक्रारदार भीमराव चिंचवाडे यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, हे.कॉ. श्रीधर सावंत, मनोज खोत, संदीप पावलेकर, कृष्णात पाटील, सहा. फौजदार सर्जेराव पाटील यांच्या पथकाने केली आहे.
एजंटांच्या साखळीने घेतला धसका
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरोळ गावचावडी कार्यालयातील तलाठ्यावर आठ वर्षांनंतर दुसर्यांदा कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागातील कर्मचार्यांत खळबळ माजली आहे. आजच्या कारवाईतील संशयित तलाठी माळी याच्यावर कारवाई झाल्यामुळे जमीन खरेदी-विक्री प्रकरणातील एजंटांच्या साखळीने चांगलाच धसका घेतला आहे.
Tags : kolhapur, kolhapur news, crime, bribe, Talathi arrested,