Sun, Feb 23, 2020 02:45



होमपेज › Kolhapur › नवीन तलाठ्यांना प्रशिक्षणच नाही

नवीन तलाठ्यांना प्रशिक्षणच नाही

Published On: Dec 01 2017 8:55AM | Last Updated: Dec 01 2017 12:52AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : अनिल देशमुख

नव्याने भरती होणार्‍या तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, त्याकरिता संस्थाच उपलब्ध होत नसल्याने नव्या तलाठ्यांना प्रशिक्षणच मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशिक्षणासाठी गेल्या वर्षी आलेला 13 लाख रुपयांचा निधी परत पाठवण्यात आला आहे. यावर्षी निधी नको अशीच मानसिकता जिल्हा प्रशासनाची झाली आहे.

जिल्हा प्रशासनात तलाठी म्हणून भरती झालेल्या उमेदवारांना जिल्हा प्रशासनाची माहिती व्हावी, त्यांच्या कामाचे स्वरूप समजावे, शेती, पीक-पाणी, नैसर्गिक आपत्ती, सात-बारा आदी महत्त्वाच्या विषयांचा थेट संबंध येत असल्याने त्याची नेमकी आणि योग्य माहिती व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने तलाठ्यांना चार महिने निवासी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ‘रामेती’ या शासकीय संस्थेची निवड केली.

जिल्ह्यात 2015-16 या वर्षी 13 नवीन तलाठ्यांची भरती झाली. या तलाठ्यांच्या प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने जिल्ह्याला 13 लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधीही प्राप्त झाला. मात्र, ‘रामेती’ संस्थेकडे निवासी व्यवस्था उपलब्ध नसल्याने या तलाठ्यांचे प्रशिक्षण होऊ शकले नाही. अखेर या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देता येत नसल्याने प्रशासनाने हा निधी परत केला. दरम्यान, यावर्षीसाठी या प्रशिक्षणासाठी किती निधीची आवश्यकता याबाबत शासनाने विचारणा केली आहे. गेल्या वर्षी प्रशिक्षणच होऊ न शकल्याने निधी परत द्यावा लागला असताना आता नव्याने निधी घ्यायचा का? निधी घेतला तरी प्रशिक्षण कोठे द्यायचे आणि तो खर्च कसा करायचा, असा सवाल जिल्हा प्रशासनाला पडला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवण्याच्या तयारीत आहे.