Sun, Aug 18, 2019 15:31होमपेज › Kolhapur › एसटीपीसाठी भाड्याने जागा घेणार

एसटीपीसाठी भाड्याने जागा घेणार

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:47PMकोल्हापूर : विकास कांबळे

पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गावांमध्ये सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी बांधण्यात येणार्‍या प्रकल्पाकरिता जागेची मोठी अडचण आहे. प्रकल्पासाठी कायमस्वरुपी विकत जागा देण्याकरिता काही ठिकाणी शेतकरी तयार नसल्याने या  जागा भाडेतत्वावर घेण्याचा जिल्हा परिषद विचार करत आहे. भाड्याची रक्‍कम शेतकर्‍याला त्या शेतीतून वर्षाला मिळणार्‍या उत्पन्नावर आधारीत असणार आहे. त्यामुळे जागेचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणासाठी महापालिका, नगरपालिका यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या काही वर्षापर्यंत आंदोलन होत होती. मात्र नदी काठची गावे देखील पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असल्यो निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषदेलाही पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्‍नी जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषेदच्या वतीने पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठ उपाययोजना आखण्यास सुरुवात करण्यात आली. त्याकरिता प्रथम पंचगंगा नदी खोर्‍याचे सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणात नदी काठावरील 39 गावांचा पाणी थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. या 39 गावांमध्ये  सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

प्रकल्प उभा करत असताना जागेची मोठी अडचण असल्याचे लक्षात आले. प्रकल्पासाठी जागा देण्यासाठी गावकरी तयार नाहीत. ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. याकरिता निधी मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. पण शासनाने फक्‍त अधिक प्रदूषण करणार्‍या गावांचा समावेश करून नवीन प्रस्ताव पाठविण्याची सूचना करत हा प्रस्ताव परत पाठविला. त्यानुसार  94 कोटीचा नवीन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पहिल्या  टप्प्यात लोकसंख्या अधिक असलेल्या 7 गावांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी जागा देण्यास नागरिक विरोध करत आहेत. प्रकल्पासाठी एक एकरच्या आसपास जागा लागते. ही जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

शेत जमीन असल्यामुळे कदाचित शेतकरी जागा देण्यास तयार होत नसावेत. त्यामुळे जागा भाड्याने घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाडे ठरवत असताना शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.  - डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.