Sat, Jul 20, 2019 11:00होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणप्रश्‍नी अधिवेशन घ्या

मराठा आरक्षणप्रश्‍नी अधिवेशन घ्या

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजातील तरुणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने तातडीने खास अधिवेशन घ्यावे, अशी एकमुखी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

दसरा चौकात सकल मराठा समाज संघटनांच्या वतीने गेली तीन दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. गुरुवारी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांसह विविध संस्था, संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सकाळी अकराच्या सुमारास महापौर शोभा बोंद्रे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी महापौर आर. के. पोवार यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांच्याबरोबर नगरसेवक  आंदोलनाच्या ठिकाणी आले. ‘एक मराठा... लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बाबाचे’, ‘कोण म्हणतोय देत नाही...’, ‘या सरकारचं करायचं काय...’ अशा घोषणा देत ठिय्या मांडला. 

यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने महाराष्ट्रभर शांततेने मोर्चे काढून सर्वांना आदर्श घालून दिला.पण, सरकारने ठोस निर्णय घेतला नसल्याने समाजाचा संयम सुटला असून, युवक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित आरक्षणाचा निर्णय घ्यावा. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, मराठा समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावत बहुजन समाजाला भक्‍कम पाठबळ दिले आहे. सरकार माथी भडकवत आहे. त्यामुळे तरुणांनो सावध राहा. आंदोलनाने उग्ररूप धारण केले असून, आता चर्चा नको निर्णय घ्या, असेही त्यांनी सांगितले. 

दुपारी बारा वाजता करवीर विधानसभेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कुंभी कासारी कारखान्याचे संचालक, कुंभी बँकेचे संचालक ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. आमदार नरके म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. आरक्षणासाठी खास अधिवेशन बोलवून प्रश्‍न मार्गी लावून संभ्रम दूर करावा. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर करावी.

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनीदेखील ठिय्या आंदोनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. ते म्हणाले, आरक्षणाचा दिवस कधी उजाडेल, अशी अपेक्षा होती; पण भ्रमनिरासच झाला आहे. आरक्षणाचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल. प्रसंगी सरकारच्या विरोधात जावे लागले तरी चालेल.मराठी माणूस दिलदार व शिस्त प्रिय  असून बहुजन समाजाच्या हाकेला तो कधीही धावून येतो. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शासनाने नोकर भरती करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मेगा नोकर भरती थांबवा 

शासनाच्या विविध विभागांत रिक्‍त जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शासनाने मेगा नोकर भरती थांबवावी, अशी आग्रही मागणी अनेकांनी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी केली. 

पोवाड्यातून जनजागृती

‘जगायचं हाय काय... मरायचं हाय...आता काय मागं सरायचं नाय... घेरणार्‍याला घेरायचं हाय...’ अशा स्फुर्तीदायी पोवाड्यातून शाहीर रंगराव पाटील यांनी आंदोलकांत चैतन्य भरले.पाटील यांच्या शाहिरी पथकानेदेखील मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला.

...यांनी दिला पाठिंबा 

 मुस्लिम संघटना, अर्थमुव्हर्स असोसिएशन, क्रीडाई असोसिएशन, जिल्हा काँग्रेस, जिल्हा राष्ट्रवादी, जिल्हा शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मराठा रणरागिणी महिला मंडळ,जिजाऊ ब्रिगेड, बार असोसिएशन, जिल्हा अ‍ॅटोरिक्षा संघर्ष समिती, कॉन्ट्रॅक्टर अ‍ॅन्ड मशिनरी असोसिएशन

87 वर्षीय आजोबांचा आरक्षणासाठी ठिय्या 

ठिय्या आंदोलनात समाजातील सर्वच घटकांचा सहभाग आहे. गुरुवारी या ठिय्या आंदोलनात यवलूज येथील वसंत मोरे (वय 87) यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. ‘एक मराठा ... लाख मराठा’ या त्यांच्या घोषणेला आंदोलकांनी प्रतिघोषणेने दाद दिली.