Mon, Jun 17, 2019 02:50होमपेज › Kolhapur › सहलीला जाताय खबरदारी घ्या..!

सहलीला जाताय खबरदारी घ्या..!

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:00AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी  

शाळेच्या सहलीच्या बसला तुळजापूर-सोलापूर मार्गावर अपघात होऊन तीन वर्षांपूर्वी सांगवडे (ता.करवीर) येथील सात विद्यार्थ्यांसह चालकाला जीव गमवावा लागला होता. दोन वर्षांपूर्वी एसएससी बोर्डासमोरील कराड येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बस उलटून अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, त्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला होता. गुरुवारी कर्नाटकातील शालेय सहलीच्या बसला अपघात होऊन वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे शासकीय विश्रामधामजवळील वळणावर अपघात होऊन दहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. सहलीदरम्यान वारंवार होणार्‍या अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘खबरदारी’च महत्त्वाची आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे याही शैक्षणिक वर्षांत सहलींची सुरुवात झाली आहे. एस.टी.महामंडळाच्या गाड्या साध्या असल्याने आणि त्या आरक्षित करण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे,जादा पैसे भरावे लागत असल्याने बहुतांशी शाळा व शैक्षणिक संस्थांकडून खासगी बसेसला पसंती दर्शवली जाते. काही शैक्षिक संस्थांकडे स्वत:च्या बसेस आहेत. त्यातूनही सहलीचा प्रवास केला जातो. ज्ञान व मनोरंजनाच्या उद्देशाने काढण्यात येणार्‍या शालेय सहली व्यवस्थित होण्यासाठी शैक्षणिक संस्था, शाळा, पालक, वाहन चालक आणि विद्यार्थी या सर्व घटकांकडून काळजी घेेतलीच पाहिजे. छोट्या-मोठ्या मार्गावर सूचना फलकांच्या माध्यमातून वाहनचालकांना सावध केले जाते. मात्र, त्यांचा गांभीर्याने विचार होत नसल्याने छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सुरक्षितपणे सावधानतेने आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

नियमांचे उल्‍लंघन केल्यावर परवानगी नाही : सावंत 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी नियमांचे तंतोतंत पालन शाळांनी केलेच पाहिजे. सहलीबाबत शाळांना सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.ज्या शाळेतील विद्यार्थिनी आहेत, तेथील महिला शिक्षिका किंवा शालेय व्यवस्थापन समितीतील महिला सदस्य सहलीसोबत हवाच. नियमांचे पालन न करणार्‍या शाळांना आपण परवानगी देत नाही, अशी माहिती पन्हाळ्याच्या शिक्षणाधिकारी सौ. एस. एस.सावंत यांनी दिली.

सहलीची काळजी 

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहली काढताना संबंधित गटशिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घ्यावी.
सहलीच्या सर्व बाबी संबंधित शैक्षणिक अधिकार्‍यांना लेखी कळवाव्यात.
प्राथमिक शाळेच्या सहली या परिसर भेट व संध्याकाळी घरी परत येतील, अशा स्वरूपाच्या असाव्यात. रात्रीचा प्रवास करू नये.
साहशी खेळ, वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क येथे सहली काढू नये.
रेल्वे क्रॉसिंगवरून बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी. रेल्वे पुढे गेल्याची व रेल्वे नसल्याची खात्री करावी.
शाळेच्या शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व शैक्षणिक संस्थेवर नियमानुसार कारावाई होऊ शकते.
समुद्र किनारे व अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत. 
विद्यार्थ्यांची हेळसांड, कुचंबना किंवा मानसिक, शारीरिक त्रास झाल्यास त्याची पालकांकडून तक्रार आल्यास जबाबदार शिक्षकांवर कारवाई केली जाईल. 
शाळांनी या सर्व सूचनांचे पालन केले आहे का, ही खात्री अधिकार्‍यांनी करावी. आणि त्या संबंधी शंभर रुपयांच्या स्टँपवर हमीपत्र घेऊनच सहलींसाठी परवानगी द्यावी. हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर देखील कारवाई केली जाईल. 
सहली नेण्यापूर्वी विद्यार्थी व दोन शिक्षकांना आपत्कालीन परिस्थितीबाबत प्रशिक्षण द्यावे. 
सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. 
सहलीसाठी एस.टी. बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी मान्यता दिलेल्या बस वापराव्यात.
शिक्षकांनी व चालकांनी तंबाखू, गुटखा, अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये. 
विद्यार्थ्यांना सहलीसाठी शिक्षण संस्थांनी सक्‍ती करू नये.
विद्यार्थ्यांनी मोबाईलवरून पालकांशी संपर्क साधावा.
सहलीत विद्यार्थिनी असतील तर महिला शिक्षिका व महिला पालक सोबत असावेत. 
प्रथमोपचार पेटी सोबत ठेवावी.