Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Kolhapur › जादा पैसे घेणार्‍या गॅस वितरकांवर कारवाई करा

जादा पैसे घेणार्‍या गॅस वितरकांवर कारवाई करा

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जादा पैसे घेणार्‍या गॅस वितरकांवर कारवाई करा, असा आदेश सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील यांनी दिला. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी आठवडी बाजारातून ग्राहकांची फसवणूक, अडवणूक होऊ नये, यासाठी अन्‍न व औषध प्रशासन विभाग आणि वजनमापे विभागाने आठवडी बाजारांची अचानक तपासणी करावी, यासाठी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 

आठवडी बाजारात भेसळयुक्‍त खाद्यपदार्थांची विक्री होते, तसेच वस्तूंची जादा दराने विक्री होते. यामुळे सर्वच आठवडी बाजारांची अचानकपणे तपासणी करून दोषी आढळणार्‍या विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना पाटील यांनी केली. प्रवासी ग्राहकांकडून रिक्षाचालकांनी मीटरनुसार पैसे घेणे बंधनकारक असून, याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने दक्ष राहून प्रवासी ग्राहकांची फसवणूक अथवा अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्या, गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांसाठी तक्रार बुक ठेवणे बंधनकारक आहे, त्याची अंमलबजावणी होत नसेल तर कारवाई करा, तसेच पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या वाहनांना मोफत हवा, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, याबाबत सर्वच पेट्रोल पंपचालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेतकर्‍यांना खते, बियाणे, तसेच कीटकनाशके योग्य किमतीत व दर्जेदार उपलब्ध व्हावीत, याबाबत कृषी विभाग दक्ष आहे. विक्रेत्यांकडून शेतकरी ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनी तत्काळ ग्राहक संरक्षण कक्षाशी अथवा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी उपसंचालक श्रीमती बी. पी. फरांदे यांनी केले. डास निर्मूलनासाठी जिल्ह्यात एकात्मिक डास निर्मूलन मोहीम गतिमान केली असून, दर गुरुवारी कोरडा दिवस पाळला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले. 

या बैठकीस सहायक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र नरेंद्रसिंह मोहनसिंह, अन्‍न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्‍त एम. एस. केंबळकर, औषध निरीक्षक श्रीमती एस. के. महिंद्रकर, विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता गीता काळे, ग्राहक संरक्षण परिषदेचे अरुण यादव, अनिल जाधव, पांडुरंग घाटगे, दीपक बंडगर, तानाजी पाटील, प्रशांत पुजारी, कुलाजी खैरे, सुप्रिया दळवी यांच्यासह सर्वसंबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.