Tue, Apr 23, 2019 19:59होमपेज › Kolhapur › सकारात्मक विचाराने वाटचाल करा 

सकारात्मक विचाराने वाटचाल करा 

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सकारात्मक विचारातून जीवनाची सुंदर वाटचाल करणे गरजेचे आहे.आयुष्याच्या वाटेवर सातत्याने पाठलाग करत ध्येयपूर्ती करावी, मन शुद्ध असेल तर जे पेराल तेचं उगवेल, दगडात देव शोधण्यापेक्षा माणसातले देवपण जपा असा जीवनपयोगी सल्‍ला माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला. निमित्त होते कुमावत सेवा संघ संचलित कलामंदिर महाविद्यालयाच्या वार्षिक चित्र शिल्प प्रदर्शनाचे. शाहू स्मारक भवन येथे सोमवारी (दि. 26) आयोजित कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शाहूवाडी तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक आर.आर. पाटील, उद्योगपती सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे आधारवड ज्येष्ठ चित्रकार डी.व्ही. वडणगेकर यांना कलारत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते  शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्रसंगी उत्तर देताना चित्रकार वडणगेकर म्हणाले, शिक्षणाची समाजाला गरज नाही, अशी भावना आजच्या तरुणाईत निर्माण झाली आहे. मात्र, यात तथ्य नाही. पुरस्कार देण्यापेक्षा सर्वोत्तम कलाकार घडवण्याचे कार्य संस्थेच्या वतीने क रण्यात यावे, तसेच शासन आणि समाजातील दानशूर व्यक्‍तीच्या सहकार्यातून संस्थेची स्वमालकीची वास्तू उभारावी असा मनोदयही वडणगेकर यांनी व्यक्‍त केला. या प्रदर्शनात पेंटिंग, शिल्पकला विभागातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. सदरचे चित्रप्रदर्शन दि. 26 ते 28 फेब्रुवारी अखेर कलारसिकांना पाहता येणार आहे. यावेळी मारुतराव कातवरे, संभाजी माजगावकर, संस्थेचे प्राचार्य जी. एस. माजगावकर, राजेंद्र वागवेकर, माजी आ. नानासाहेब माने उपस्थित होते.