Tue, Apr 23, 2019 10:02होमपेज › Kolhapur › जनजागृती अभावी क्षयरोगाचा फैलाव

जनजागृती अभावी क्षयरोगाचा फैलाव

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:37AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

क्षयरोग(टी.बी.) ही एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. भारतातील 40 टक्के व्यक्‍तींना क्षयरोगाच्या जंतूंची बाधा झालेली आहे. त्यामुळे दररोज एक हजार व्यक्‍तींचा मृत्यू होतो.ही वाढती संख्या चिंताजनक असून, या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे.प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोधमोहिमेवर आरोग्य विभागाने भर दिला आहे.जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर अखेर 3796 रुग्ण क्षयरोग बाधित आहेत. त्यापैकी सरकारी रुग्णालयात 2395 इतके तर खासगी रुग्णालयात 1401 उपचार घेत आहेत.जिल्ह्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा क्षयरोग केंद्राने पायाला भिंगरीच बांधली आहे. खरंच प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोधमोहिमेवर भर दिल्यास या गंभीर समस्या नियंत्रणात येईल. 

भारतातील माता मृत्यूपेक्षाही क्षयरोगामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या आजाराला कंटाळून दरवर्षी 3 लाख मुले शालेय शिक्षण सोडत असल्याचे धक्‍कादाय वास्तवही पुढे आले आहे. 85 ते 90 टक्के रुग्णांना फुफ्फुसाचा क्षयरोग असतो. या आजाराचे प्रमाण बालकांमध्ये सर्वाधिक असल्याचेही वैद्यकीय अहवालात पुढे आले आहे.त्यामुळे  महाराष्ट्र शासनाने सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. 

असा होतो क्षयरोग (टी.बी.)

*कोणत्याही व्यक्‍तीला क्षयरोग होतो.
*मायक्रोबॅक्टेरिअम ट्यूबरक्युलासीस जंतूमुळे होतो.
*खोकला आणि शिंकेतून त्याचे जंतू हवेत पसरतात.
*रोगप्रतिकार शक्‍ती कमी असणार्‍या व्यक्‍तींच्या शरीरात क्षयरोगाच्या जंतूचा संसर्ग गतीने होतो.

प्रमुख लक्षणे- 
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, वजन कमी होणे, छातीत दुखणे, दम लागणे, संध्याकाळी हलका ताप येणे व भूक कमी लागणे. रोगाचे प्रमाण वाढल्यास बेडक्यातून रक्‍त पडणे, फुफ्फुसाव्यतिरिक्‍त अन्य अवयवांना क्षयरोग झाल्यास बाधित अवयवांप्रमाणे रोगाची लक्षणे आढळून येतात. उदा : सांधेदुखी, पाठदुखी, पोटात दुखणे, डोके दुखणे, बेशुद्ध होणे व लसिकाग्रंथीना सूज येणे. 

    *प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोधमोहिमेवर भर हवा 
    *जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या गंभीर 
    *या आजाराचे बालकांमध्ये सर्वाधिक प्रमाण 
    *जिल्ह्यात 3 हजार 796 रुग्णांना क्षयरोग 

असा करा प्रतिबंध 
*रोग्याच्या  सहवासात असणार्‍यांनी तपासणी करून घ्यावी. 
*डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
*आजार पूर्णतः बरा होईतोपर्यंत औषधे नियमित घ्यावी.
*खोकताना आणि शिंकताना तोंडावर रूमाल धरावा.
*जन्मत:च बालकाचे बी.सी.जी. लसीकरण करून घ्यावे.
*उपचार मध्येच सोडू नयेत. 
*एच.आय.व्ही. बाधित रुग्णांनी क्षयरोग विरोधी औषधोपचाराबरोबर ए.आर.टी. व कोट्रायमॉक्सजॉल उपचार महत्त्वाचे