Thu, Apr 25, 2019 15:29होमपेज › Kolhapur › दूध दरवाढ आंदोलनाबाबत ‘स्वाभिमानी’चा मेळावा

दूध दरवाढ आंदोलनाबाबत ‘स्वाभिमानी’चा मेळावा

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 12:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गायीच्या दुधाला प्रतीलिटर पाच रुपये अनुदान सरकारने द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तयारीसाठी शुक्रवारी (दि. 6) कोल्हापुरात मेळावा होत आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये दुपारी दोन वाजता होणार्‍या या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत. 

दरम्यान, या आंदोलनाचा दूध संघांनी चांगलाच धसका घेतला आहे. कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात दूध मुंबईला जाते. मागणी मान्य झाल्यास संघटनेच्या पूर्वानुभवानुसार हे आंदोलन तीव्र होणार आहे. अशा परिस्थितीत मुंबईला दूध पाठवण्याबरोबच संकलनाचाही मोठा प्रश्‍न संघासमोर आहे. 

गायीच्या दुधापासून तयार होणार्‍या पावडरचे दर उतरल्याने दूध संघांनी गाय दुधाच्या खरेदी व विक्री दरात मोठी कपात केली आहे. ही पावडर शासनाने खरेदी करावी, कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही गाय दूध उत्पादकाला प्रतीलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे. 

संघटनेच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी तालुकानिहाय संघटनेचे संपर्क दौरे सुरू आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून उद्या होणार्‍या मेळाव्याला जास्तीत जास्त दूध उत्पादक, शेतकरी येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्याच्या मेळाव्यात या आंदोलनाची रणनीती आखण्यात येईल. मेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, सावकर मादनाईक आदी मार्गदर्शन करणार आहेत.