Tue, Jul 16, 2019 14:09होमपेज › Kolhapur › दूध आंदोलनावर ‘स्वाभिमानी’ ठाम

दूध आंदोलनावर ‘स्वाभिमानी’ ठाम

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 1:05AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

शासनाने निर्यात होणार्‍या दुधाला जाहीर केलेले अनुदान सर्व उत्पादकांना मिळणार नसल्याने 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईचे दूध रोखण्याच्या आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी तालुकानिहाय संघटनेच्या बैठका सुरू आहेत. 

गायीच्या दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी संघटनेने 16 जुलैपासून दूध संकलन बंद व मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार झाला. त्याचदिवशी शासनाने निर्यात दुधाला प्रती लिटर पाच रुपये तर पावडरला प्रती किलोला 50 रुपये अनुदान जाहीर केले. 

निर्यात दूध करणारे संघ कमी आहेत, दुधाची निर्यातही कमी होते, त्यामुळे हा निर्णय स्वाभिमानीला मान्य नाही. सरसकट गायीच्या दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान मिळावे यावर संघटना ठाम आहे, तसा आदेश काढल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केला. संघटना एकिकडे आंदोलनावर ठाम असताना सरकारी पातळीवरही हे आंदोलन होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत.