Mon, Apr 22, 2019 22:01होमपेज › Kolhapur › गनिमी काव्याने ‘स्वाभिमानी’चा चक्‍काजाम

गनिमी काव्याने ‘स्वाभिमानी’चा चक्‍काजाम

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न झुगारून लावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने गुरुवारी किणी टोल नाक्यावर चक्‍काजाम आंदोलन करून वाहतूक रोखली. सुमारे 35 मिनिटे महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न झुगारून लावत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने गुरुवारी किणी टोल नाक्यावर चक्‍काजाम आंदोलन करून वाहतूक रोखली. सुमारे 35 मिनिटे महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्‍काजाम आंदोलन होऊ द्यायचे नाही, यासाठी पोलिसांचे प्रयत्न आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केेल्याने  किणी गावातील पाटीलवाड्यात थांबलेल्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांचा लोंढा थेट रस्त्यावर आला. गनिमी काव्याप्रमाणे गायींसह रस्त्यावर आलेल्या या कार्यकर्त्यांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त असताना किणी टोल नाक्यावर चक्‍काजाम आंदोलन केले.

या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 35 मिनिटे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुरुवातीला आंदोलन होऊच द्यायचे नाही, असा पवित्रा घेतलेल्या पोलिसांनाही नंतर हे आंदोलन पाहण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे, यासाठी 16 जुलैपासून संघटनेेच्या वतीने राज्यभर दूध संकलन बंद व मुंबईला जाणारे दूध रोखण्याचे आंदोलन सुरू आहे. चार दिवसांपासून आंदोलन करून शासन मागण्या मान्य करत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी संघटनेने महामार्गावर किणी टोल नाक्यावर चक्‍काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाची वेळ दुपारी साडेबाराची होती; पण कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन होऊ द्यायचे नाही, यासाठी सकाळपासूनच प्रचंड पोलिस बंदोबस्त टोल नाक्यावर तैनात करण्यात आला होता. याशिवाय महामार्गावर सांगली फाटा, वाठार फाटा यासह टोल नाक्यावर येणार्‍या मार्गांवरही पोलिस तैनात करण्यात येत होते. सांगलीकडून येणार्‍या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी कणेगाव, इस्लामपूर फाटा या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सुरुवातीला सांगलीहून येणार्‍या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमध्ये बसवले. या कार्यकर्त्यांना घेऊन जाणारी व्हॅन टोल नाक्यावर आल्यानंतर ती अडवण्याचा प्रयत्न जिल्हाध्यक्ष भगवान काटे व इतरांनी केला. अजून आंदोलनच चालू नाही, तर कार्यकर्त्यांना का ताब्यात घेता, असा सवाल काटे यांनी उपस्थित केला. तरीही या कार्यकर्त्यांना पोलिस घेऊन गेेले. यावरून पोलिस आंदोलन करू देणार नाहीत, अशी खात्री झाल्यानंतर हजारो कार्यकर्ते किणीत एकत्र  आले.  त्यात महिलांचीही संख्या मोठी होती.

पाटीलवाड्यात थांबलेले कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले होते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व संघटनेचे भगवान काटे, स्वस्तिक पाटील, प्रा. जालंदर पाटील करीत होते; पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली.

त्यानंतर प्रचंड घोषणा देत महिलांसह हजारो कार्यकर्ते महामार्गावर आले. किणी टोल नाक्यावर येईपर्यंत कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन महामार्ग दणाणून सोडला. त्यानंतर रस्त्यावरच कार्यकर्त्यांनी ठाण मांडले. त्यांच्यासोबत असलेल्या गायींना चाराही आणला होता. चार्‍यासह गायीही रस्त्यावर धरून ठेवण्यात आल्या. त्यामुळे महामार्ग ठप्प झाला. या मोर्चासमोर प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, भगवान काटे यांची भाषणे झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे 35 मिनिटे महामार्ग रोखून धरण्यात आला.

काटे-पोलिस वादावादी

आंदोलन सुरू होण्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना घेऊन जाणारी व्हॅन टोल नाक्यावर येताच काटे व इतरांनी ती रोखली. त्यावेळी काटे यांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कारवाई का केली, असा जाब विचारल्यानंतर पोलिस आपल्या कारवाईवर ठाम राहिले. त्यातून पोलिस व काटे यांच्यात जोरदार वादावादी झाली. काही कार्यकर्ते या व्हॅनसमोर रस्त्यावरच आडवे झोपले. 

पाटीलवाडा केंद्रस्थानी

आंदोलनासाठी मोठा पोलिस बंदोबस्त नेमल्याने व अन्य भागांतून येणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांना थेट आंदोलनस्थळी न आणता किणी गावातील पाटीलवाड्यात एकत्र करण्यात आले. या ठिकाणी सुमारे दीड हजार कार्यकर्ते तळ ठोकून होते. त्यामुळे हा वाडाही या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिला.

आंदोलनाची हवा गेली काय? ः महाडिक

आंदोलन सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरून माजी आमदार महादेवराव महाडिक कोल्हापूरच्या दिशेने येते होते. काटे यांना पाहून ते थांबले. मीच तुम्हाला सुरुवातीला बळ दिले; पण आता यात भाग घेता येत नाही, असे ते काटे यांना म्हणाले. गर्दी न दिसल्याने त्यांनी आंदोलनाची हवा गेली काय, अशी गुगली टाकताच काटे यांनी अजून आंदोलन सुरू झालेले नाही, झाले की तुम्हाला फोन करून सांगतो, असे प्रत्युत्तर दिले.

टोल बंद, रुग्णवाहिकेला रस्ता

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर  सकाळी नऊ वाजल्यापासूनच नाक्यावर बंदोबस्त होता. सुरुवातीला पोलिसांनी टोल वसुली दुपारी दोनपर्यंत बंद केली. आंदोलन सुरू झाल्यानंतर एक रुग्णवाहिका पुण्याच्या दिशेने निघाली, कार्यकर्त्यांनी या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला.

घोषणांनी परिसर दणाणला

‘दूध आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘दुधाला अनुदान मिळालेच पाहिजे’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’ यासारख्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोेडला. 

कार्यकर्त्यांना अटक व सुटका

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर टोल नाका परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आंदोलनानंतर या आदेशाचा भंग केल्याबद्दल भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील यांच्यासह इतरांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. 

पिक्‍चर अभी बाकी है!

कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रा. जालंदर पाटील यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आता चालत आम्ही आलो आहोत, भविष्यात सरकारवर चाल करायलाही मागे-पुढे पाहणार नाही. हा आंदोलनाचा ट्रेलर आहे, पिक्‍चर अभी बाकी है! शासनाने तातडीने दुधाला अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. पद्माराणी पाटील व संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

खा. शेट्टींच्या इशार्‍यानंतर पोलिस नरमले

सकाळपासूनच पोलिसांनी नाक्याच्या दिशेने येणारी वाहने तपासण्यास सुरुवात केली होती. वाहनातून जनावरे आणलीत का, कार्यकर्ते आले का, याची तपासणी ते करत होते, त्यासाठी प्रत्येक फाट्यावर पोलिस थांबून होते. पोलिस आंदोलनच करू देत नाहीत, याची माहिती खासदार राजू शेट्टी यांना समजताच त्यांनी फोनवरूनच आंदोलन न झाल्यास कार्यकर्ते आक्रमक होतील, असा इशारा देताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. 

नाक्याला पोलिस छावणीचे स्वरूप

या आंदोलनासाठी टोल नाक्यावर एक अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आर. आर. पाटील, सूरज गुरव, कृष्णात पिंगळे यांच्यासह 12 पोलिस निरीक्षक, 500 पोलिस, एसआरपीच्या तीन तुकड्या असा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे नाक्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिस अधीक्षक संजय मोहिते हेही या ठिकाणी थांबून होते. काही वेळासाठी सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीही भेट दिली. इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे हेही यावेळी उपस्थित होते. 

खा. शेट्टी यांच्या पत्नींचेही रस्त्यावर ठाण

या आंदोलनात खासदार राजू शेट्टी यांच्या पत्नी सौ. संगीता याही सहभागी झाल्या. किणीतून त्यांनी चालतच टोल नाका गाठला आणि रस्त्यावरच महिला कार्यकर्त्यांसह ठाण मांडले. माझ्याही गायी आहेत, गायीच्या दुधाला अनुदानाची मागणी योग्य आहे, म्हणूनच मी आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.