Sun, Jul 21, 2019 16:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › परवान्यापेक्षा जादा बॉक्साईट उत्खननाचा संशय!

परवान्यापेक्षा जादा बॉक्साईट उत्खननाचा संशय!

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:54PMकोल्हापूर : सुनील कदम

राधानगरी अभयारण्यातून दिवसाकाठी शेकडो ट्रक हिंडाल्को कंपनीसाठी या भागातून कित्येक हजार टन बॉक्साईटची वाहतूक करताना दिसतात. कंपनीला बॉक्साईट उत्खननासाठी कागदोपत्री देण्यात आलेल्या परवान्यातील प्रमाण आणि प्रत्यक्षात या ठिकाणाहून होत असलेले बॉक्साईटचे उत्खनन आणि वाहतूक यामध्ये प्रथमदर्शनी तरी जमीन अस्मानचा विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीला देण्यात आलेला परवाना आणि प्रत्यक्षातील खोदाई व वाहतूक प्रमाण यांची काटेकोर तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

पर्यावरण खाते, वनखाते, इंडियन ब्युरो ऑफ माईन्स आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या परवानगीने हिंडाल्को कंपनीमार्फत हे उत्खनन सुरू आहे. शासनाकडून कंपनीला या भागात वार्षिक 8 लाख 64 हजार टन बॉक्साईट खोदाई आणि वाहतुकीचा परवाना देण्यात आलेला आहे. ही आकडेवारी विचारात घेता दररोज साधारणत: 2 हजार टनाहून काहीसे जास्त बॉक्साईटचे प्रमाण ठरते. मात्र, सध्या या ठिकाणावरून दररोज सुरू असलेले बॉक्साईटचे उत्खनन आणि वाहतुकीचे प्रमाण विचारात घेता परवान्यापेक्षा जादा बॉक्साईट नेले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे कंपनीच्या बॉक्साईट परवान्याची आणि प्रत्यक्षातील वापराची खोदाईच्या ठिकाणापासून ते पार वापराच्या ठिकाणापर्यंतची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

वास्तविक पाहता संबंधित कंपन्यांनी किती टन बॉक्साईटचे उत्खनन केले, बॉक्साईटच्या प्रतवारीनुसार त्याची किती रॉयल्टी होते, ही रॉयल्टी संबंधितांनी भरली की नाही, याची मोजदाद करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा शासकीय रॉयल्टीपेक्षा आपापली ‘रॉयल्टी’ दरमहा गोळा करण्यातच धन्यता मानते की काय, असा सगळा मामला प्रत्यक्षदर्शी तरी दिसून येत आहे.

बॉक्साईटचे उत्खनन आणि त्याची वाहतूक याबाबत वनखाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम आणि कायदे अतिशय कडक आहेत. बॉक्साईटचे उत्खनन करताना कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक वनराईचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या वनखात्याच्या सक्त सूचना आहेत. मात्र, हिंडाल्को कंपनीने त्या कधीच धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे. बॉक्साईटच्या उत्खननासाठी आणि त्याच्या वाहतुकीसाठी रस्ते तयार करताना आजअखेर अक्षरश: हजारो वृक्षांची कत्तल झालेली आहे. कत्तल केलेले हे वृक्षही काही जणांनी परस्पर लंपास केले आहेत. त्याच्या किमतीची तर 
मोजदादच करता येणार नाही, बॉक्साईटच्या वाहतुकीसंदर्भातही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असेच कडक नियम आहेत. बॉक्साईटची धूळ ही श्‍वसनासाठी घातक असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याची वाहतूक उघड्यावर करू नये, असा दंडक आहे. मात्र, हा दंडक खुंटीला टांगून बॉक्साईटचा धुरळा उडवत बॉक्साईटची वाहतूक सुरू आहे. याची  चौकशी होणे गरजेचे आहे.
मोजदादीला कुणीच नाही वाली!

या ठिकाणावरून हिंडाल्को कंपनी किती टन बॉक्साईटचे उत्खनन करते, किती टन बॉक्साईटची वाहतूक करते, याची मोजदाद करण्यासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा कार्यरत असण्याची आवश्यकता आहे. मात्र, हिंडाल्कोच्या बॉक्साईट खाणींच्या परिसरात त्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसते. या बाबतीतील शासनाचा सगळा कारभार त्याठिकाणी रामभरोसे दिसून येतो. त्यामुळे या बाबतीत संबंधित शासकीय अधिकार्‍यांचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे.