होमपेज › Kolhapur › काळे धंदे न रोखल्यास अधिकार्‍यांचे निलंबन : संजय मोहिते 

काळे धंदे न रोखल्यास अधिकार्‍यांचे निलंबन : संजय मोहिते 

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वारंवार आदेश होऊनही काळे धंदेवाल्यांसह तस्करी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई न केल्यास पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी पोलिस अधिकार्‍यांना दिला.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्याअंतर्गत प्रभारी अधिकार्‍यांची येथील मुख्यालयात गुरुवारी सकाळी तातडीची बैठक झाली. पोलिस अधीक्षक मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या उपस्थितीत पाच तास चाललेल्या बैठकीत प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना पोलिस अधीक्षक म्हणाले, सराईत गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या टोळ्यांविरुद्ध तडिपारीसह मोकाअंतर्गत कारवाईचे प्रस्ताव तातडीने दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याची  शक्यता आहे.  या पार्श्‍वभूमीवर प्र्रतिबंधात्मक कारवाईसाठी पावले उचलण्यात येत आहेत. चेन स्नॅचिंगसह जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे पुन्हा वाढले आहेत. उपनगरे, ग्रामीण भागात परप्रांतीय सराईतांचा वावर वाढला आहे.गर्दी, मारामारीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. काळे  धंदे फोफावले आहेत. कोल्हापूर शहर, इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, शिरोली एमआयडीसी, हातकणंगले, पेठवडगाव परिसरातील मटका जुगार अड्डे, स्किलगेमच्या नावाखाली चालणारे तीनपानी क्लबवर विशेष पथकामार्फत कारवाई केली जाईल. जबाबदार  अधिकारी, पोलिसावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सुनावले.

बैठकीला पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सूरज गुरव, कृष्णात पिंगळे, डॉ. प्रशांत अमृतकर, विनायक नरळे, चंदगडचे उपअधीक्षक आर. आर. पाटील, आर्थिक गुन्हे अन्वेषणचे उपअधीक्षक राजेंद्र शेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.