Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Kolhapur › चित्रपट महामंडळ निवडणूक फेरमतमोजणीत सुशांत शेलार विजयी

चित्रपट महामंडळ निवडणूक फेरमतमोजणीत सुशांत शेलार विजयी

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अभिनेता गटातील मतांची सोमवारी फेरमतमोजणी होऊन यामध्ये अभिनेता सुशांत शेलार 16 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे विजय पाटकर यांचे संचालकपद रद्द झाले आहे. शेलार यांना 591 तर पाटकर यांना 575 मते मिळाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या फेरमतमोजणीचे आदेश दिले होते.  

एप्रिल 2016 मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. कोल्हापुरात 27 एप्रिल 2016 रोजी राम गणेश गडकरी हॉल येथे चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली. 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी विजय पाटकर विजयी झाल्याचे जाहीर केले होते. पाटकर यांना 584 तर शेलार यांना 566 मते मिळाली होती. शेलार यांनी निकाल अमान्य करत फेरमतमोजणीची मागणी केली, पण ती अमान्य करण्यात आली. 

यानंतर शेलार यांनी कोल्हापुरातील धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात याचिका दाखल केली, पण विषय आपल्या आखत्यारीत येत नसल्याचे कार्यालयातून सांगण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.त्यामुळे आपण उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी फेरमतमोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कोल्हापुरात अभिनेता गटाची फेरमतमोजणी झाली. यावेळी विजय पाटकर व सुशांत शेलार दोेघेही उपस्थित होते.

सकाळी साडेअकरा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाचे शिवराज नायकवडी, ए. आर. शेख, एम. के.नाईक यांनी प्रत्येक बॅलेट पेपरप्रमाणे मतमोजणी केली. दुपारी साडेचार वाजता मतमोजणी संपली. संबंधित मतमोजणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत विजय पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जो निर्णय झाला तो मला मान्य आहे.  या निकालाच्या विरोधात अपिल दाखल करण्याचा सध्या तरी विचार नाही. मी सभासद म्हणून प्रामाणिकपणे काम करणार आहे. 

सुशांत शेलार यांनी सभासदांनी दिलेल्या मतांना न्याय मिळाला आहे. माझा विजय होणार याबाबत मी आशावादी होतो म्हणूनच मी फेरमतमोजणीची मागणी केली होती. महामंडळाच्या हितासाठी काम करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, बाळा जाधव, धनाजी यमकर  आदी उपस्थित होते.