Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Kolhapur › पुरातत्त्व अधिकार्‍यांची पाहणी

पुरातत्त्व अधिकार्‍यांची पाहणी

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 29 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यायी पुलाच्या परवानगीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी पुरातत्त्व विभागाच्या वतीने उत्खनन करण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली. कोल्हापुरात दिवसभर तळ ठोकून असलेल्या या अधिकार्‍यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशीही चर्चा केली. दिवसभर या परिसरात सर्वेक्षण सुरू होते.पंचगंगा नदीवर पर्यायी पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे सुमारे 80 टक्के काम झाल्यानंतर उर्वरित काम पुरातत्त्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकले. गेली तीन वर्षे पुलाचे काम रखडले आहे. पुरातत्त्व विभागाच्या कायद्यात बदल करणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. मात्र, ते अद्याप राज्यसभेत मंजूर झालेले नाही. दरम्यान, पुलाचे शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य आणि केंद्र शासनाशी विविध पातळीवर पाठपुरावा करत या पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. बांधकामासाठी परवानगी मिळावी आणि तातडीने काम सुरू व्हावे, याकरिता कृती समितीही आग्रही आहे.

वस्तुस्थिती निदर्शनास
 

पुलाच्या बांधकामाचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ‘वर्क ऑर्डर’ काढली आहे. त्यानुसार ठेकेदाराने काम सुरू केले आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (ए.एस.आय.) दोन अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले. सकाळी दहाच्या सुमारास या अधिकार्‍यांनी शासकीय विश्रामगृहावर पोलिस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, हेरिटेज समितीच्या अध्यक्षा, आर्किटेक्‍चर अमरजा निंबाळकर आदींशी चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने पंचगंगेवरील शिवाजी पुलाची सद्यस्थिती, पर्यायी पुलाची सद्यस्थिती, अपूर्ण कामामुळे निर्माण होणारे भविष्यातील धोके, वाहतुकीचा वाढत जाणारा ताण, परवानगीसाठी प्रशासनाचा सुरू असलेला पाठपुरावा आदी वस्तुस्थिती अधिकार्‍यांसमोर मांडली. पर्यायी पुलाचे बांधकाम ज्या कारणांनी रखडले, ज्या तरतुदीने परवानगी मागितली जाते, आदी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. सुमारे दीड तास ही चर्चा सुरू होती.

ब्रह्मपुरी परिसराची पाहणी

या चर्चेनंतर अधिकारी शिवाजी पुलाजवळील ब्रह्मपुरी परिसरात आले. ब्रह्मपुरी टेकडीवर पुरातत्त्व विभागाच्या वतीने यापूर्वी केलेल्या उत्खननाच्या जागेची त्यांनी पाहणी केली. यानंतर या परिसराचे सर्वेक्षण करून त्याबाबतचा अहवाल देण्याची सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला केली. त्यानुसार या परिसराचे नकाशानुसार सर्वेक्षण करण्याचे काम दिवसभर सुरू होते.या परिसरातीत ‘पुरातत्त्व’ने उत्खनन केलेले ठिकाण, त्यापासून पर्यायी पुलाचे अंतर, या परिसराच्या सीमारेषा, या भागातील रहिवाशी क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या विविध सेवा-सुविधा, उत्खनन केलेल्या जागेची सद्यस्थिती आदी बाबींचा विचार करून अहवाल तयार करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारीही या परिसरात पाहणी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्‍तांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला. याकरिता अधिकारी महापालिकेतही गेले. मात्र, आयुक्‍तांची भेट झाली नाही. यानंतर हे अधिकारी पुन्हा ब्रह्मपुरी परिसरात आले. उत्खनन केलेल्या परिसरात पुन्हा सखोल पाहणी करण्यात आली. अधिकारी पाहणीसाठी येणार असल्याने या परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

लाईन आऊट

दरम्यान, ठेकेदारांनी पुलाच्या बांधकामासाठी कॉलम उभा करण्याकरिता ‘लाईन आऊट’ काढले आहे. या ‘लाईन आऊट’ची तपासणी करून, बांधकामाबाबत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपअभियंत्यांना दिले. त्यानुसार उपअभियंत्यांनी आज पुलाच्या तिसर्‍या कॉलमसाठी काढण्यात आलेल्या ‘लाईन आऊट’ची तपासणी केली. याबाबतचा अहवाल मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाला सादर होणार आहे. यामुळे बुधवारपासून (दि.30) कॉलमसाठी खोदकाम सुरू केले जाणार आहे.