Wed, Nov 21, 2018 21:26होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणास वारणा बँक सभासदांचा पाठिंबा

मराठा आरक्षणास वारणा बँक सभासदांचा पाठिंबा

Published On: Aug 14 2018 1:10AM | Last Updated: Aug 14 2018 12:15AMवारणानगर : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या मागण्या रास्त असून मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी राज्यभरात सुरू ठेवलेल्या सकल मराठा समाज आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्याबाबतचा एकमुखी ठराव करून त्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन श्री वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांनी बँकेच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले, त्यास सभासदांनी मंजुरी दिली. ही सभा ‘लालबहाद्दूर शास्त्री भवन येथे झाली. या सभेसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोर्ड सेक्रेटरी संपत शिंदे यांनी अहवाल सालातील दिवंगत मान्यवर व सभासदांचा श्रद्धांजलीचा ठराव मांडला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पी. सार्दळ यांनी स्वागत करून बँक देत असलेल्या पारंपरिक तसेच अत्याधुनिक सेवा सुविधांची माहिती दिली.

बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांनी प्रास्ताविकामध्ये बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अहवाल सालात बँकेने भागभांडवलामध्ये रु.25 कोटींचा टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांनी दिली. याप्रसंगी सभासदांना 10% इतका डिव्हिडंड जाहीर केलेला असून, त्यास सर्वानुमते मंजुरी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिकद‍ृष्ट्या सक्षम व उत्कृष्ठ व्यवस्थापन असलेल्या बँकांकरिता असणार्‍या सर्व निकषांचे पालन आपल्या बँकेने केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ यांनी नोटीस वाचन केले.  

या सभेस बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, ज्येष्ठ माजी संचालक प्रमोद कोरे, बसवेश्‍वर डोईजड यांच्यासह सर्व आजी-माजी संचालक, संचालिका तसेच जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, वारणा दूध संघाचे संचालक एच. आर. जाधव, माजी सभापती पंचायत समिती रवींद्र जाधव तसेच वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक-पदाधिकारी, इतर संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सदस्य जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड, हेमंत बोंगाळे, बोर्ड सेक्रेटरी संपत शिंदे इ. उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्राध्यापक एन. आर. चोपडे यांनी केले.