Tue, Jul 16, 2019 14:04होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणाआड याल तर खबरदार

मराठा आरक्षणाआड याल तर खबरदार

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 12:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कालओघात विविध कारणांमुळे बहुसंख्येने असणारा मराठा समाज मागासला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. न्याय हक्काचे असणारे आरक्षण मराठा समाजाला तातडीने मिळावे, अशी मागणी करत ‘आरक्षणाआड याल तर खबरदार...’ असा इशारा करवीर संस्थानातील सरकार घराण्यांच्या वारसांनी दिला.

सकल मराठा ठोक मोर्चा ठिय्या आंदोलनास शुक्रवारी पाठिंबा दिला. करवीर संस्थापिका छत्रपती रणरागिणी ताराराणी यांच्या कावळा नाका येथील स्मारकाशेजारी भगवा ध्वज फडकवून मोर्चाला सुरुवात झाली.यानंतर व्हिनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज आणि आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर मराठा आरक्षणला पाठिंब्यांचे निवेदन संयोजकांकडे देण्यात आले.जय भवानी ... जय शिवाजी, राजर्षी शाहू महाराज की...जय..., एक मराठा... लाख मराठा...आदी घोषणांनी मोर्चा परिसर दणाणून सोडला. मोर्चातील सर्वांनी भगव्या टोप्या, गळ्यात भगवे मफलर परिधान केल्या होत्या.

यावेळी बोलताना मोहनराव माने म्हणाले, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील सर्वच जाती-धर्मीयांना एकत्र करून लोककल्याणकारी राजवट राबविली.त्याचा हा राष्ट्रीय एकोप्याचा वारसा आजही शाहूनगरीत कोल्हापूरकरांनी जपला आहे. भविष्यातही तो कायम राहील.

रविराज निंबाळकर म्हणाले, शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्य निर्मितीत अनेक घराण्यांनी योगदान दिले आहे. हा वारसा जपत आरक्षणाच्या लढाईतही आमची आंदोलकांना  भक्कम साथ राहील. सुप्रिया निंबाळकर म्हणाल्या, जिथे विषय गंभीर तिथे मराठा समाज खंबीर असतोच. यामुळे आरक्षणाच्या या लढाईतही समाजातील सर्वांनी पाठिंबा दिला आहे.सरकारला धडकी भरायला भाग पडेल, असे मराठा समाजाने मोर्चे काढले. तरीही सरकार गप्प का असे सांगून त्या म्हणाल्या, यापुढे मराठा समाज अन्याय सहन करणार नाही.विजयसिंह शिंदे म्हणाले, दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे. अनेक मराठा समाजबांधव नोकरी, शिक्षण आणि आर्थिक अरिष्टात आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे सांगितले.

आंदोलनात मोहनराव माने, रविराज निंबाळकर, सिद्धोजी माने, विजयसिंह शिंदे, करणसिंह गायकवाड, संग्रामसिंह निंबाळकर,नकुल पाटणकर, वीरेंद्रसिंह माने, विश्‍वविजय खानविलकर, धनराजसिंह नेसरीकर, आदित्यराज डफळे, गोविंदराव गायकवाड, विनायकराव घोरपडे, संजय घाटगे, दीपक घाटगे, धनराज घाटगे, उत्तम नाईक, जशदीप इंगळे, रणजित यादव, संग्रामसिंह नेसरीकर,सत्येद्रसिंह मोहिते, अमरसिंह बागल, यशवंत खानविलकर, तेजसिंह गायकवाड, दौलतराव निंबाळकर, राजवर्धन सांब्रेकर, महेंद्रसिंह चव्हाण, राहुल जाधव, उदयसिंह घोरपडे, धैर्यशील यादव, संग्रामसिंह चव्हाण, इंद्रनिल इंगळे, शितोळे, अ‍ॅड. यशवंत खानविलकर, यश घाटगे, तेजोमय खर्डेकर, संग्रामसिंह खर्डेकर, संग्रामसिंह शिंदे, समरजित निंबाळकर,तनुजा घाटगे, सुप्रिया निंबाळकर, अरुंधती घाटगे, तेजस्विनी घोरपडे, सम्राज्ञी वाशीकर, रणजित यादव आदींनी सहभाग घेतला  होता.