Sun, Feb 23, 2020 09:56होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा

मराठा आरक्षणास प्रात्यक्षिकांद्वारे पाठिंबा

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 28 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवजयंतीदिनी रायगडावर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविलेले माळ्याची शिरोली येथील 92 वर्षांच्या दत्तू विठू पाटील यांनी शिवाजी चौकात शौर्यपीठाच्या ठिकाणी प्रात्यक्षिके सादर करून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. 

मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी दत्तू पाटील यांनी शौर्यपीठाच्या ठिकाणी शस्त्रास्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तलवार, भाले, लाठीकाठी, तसेच दांडपट्टा व इतर शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्यासोबत दादासोा देसाई, शिवाजी लोंढे, विशाल देसाई, भीमराव पाटील, सुजित निकम, स्वप्निल कांबळे, नवनाथ पाटील, प्रताप देसाई, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, दिवसभरात शौर्यपीठाच्या ठिकाणी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, मंडळाचे कार्यकर्ते धीरज पाटील आदी उपस्थित उपस्थित होते. 

दसरा चौकात अनेक गावांतून पाठिंबा
सकल मराठा मोर्चाच्या वतीने दसरा चौकात सोमवारी महे (ता. करवीर) येथील सरपंच सचिन पाटील, अनिल पाटील, सरदार पाटील, सरदार माने, गोरक्ष माने, महादेव पाटील, पंकज पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, शिवाजी मगदूम, दैवज्ञ समाजाचे एकनाथ चोडणकर, मधुकर पेडणेकर, संजय चोडणकर, शेखर देवरूखकर, सुनील बेळेकर, सतीश शिर्वटकर आदींचा समावेश होता. 

मुंबई मोर्चासाठी सभा
मराठा आरक्षणासाठी 4 सप्टेंबर रोजी मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी मंगळवारी मुरगूड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगाव येथे सभा होणार आहेत. या सभांसाठी  जिल्हा समन्वयक सहभागी होणार आहेत.