Sun, Apr 21, 2019 02:30होमपेज › Kolhapur › ब्लॉग: बुराडी सामुहिक हत्या; अंधश्रद्धा आणि अज्ञानही!

ब्लॉग: बुराडी सामुहिक हत्या; अंधश्रद्धा आणि अज्ञानही!

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 2:14AMदिल्लीच्या बुराडीमध्ये अकराजणांच्या कथित आत्महत्येमागे ‘मोक्ष मिळावा’ हे कारण असल्याचे म्हटले जात आहे. ते जर खरे असेल तर, त्यासारखे दुर्दैव दुसरे नाही. ही केवळ अंधश्रद्धाच आहे, असे नव्हे तर धर्म किंवा अध्यात्माचेही घोर अज्ञानच यामागे आहे, असेच म्हणावे लागेल. अनेक धर्मांत आत्महत्या हे महापापच मानले गेले आहे.चा र-पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका कुटुंबाने शिवशंकराचे दर्शन व्हावे म्हणून आत्महत्या केली होती. तीन मुलांसह पाचजणांच्या या कुटुंबाने कसल्याशा भ्रामक संकल्पनेतून स्वतःचे जीवन संपवले हे पाहून उभा देश हळहळला होता. फ्रीलान्स फोटोग्राफर असलेल्या कंचन सिंह नावाच्या माणसाने काही अंधश्रद्धा व देवदर्शनाबाबत भलत्याच संकल्पना मनात ठेवून स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबीयांचीही अशी फरफट केली. या प्रकाराला नुसती ‘अंधश्रद्धा’च म्हणून चालणार नाही तर हे धर्म किंवा अध्यात्माबाबतचेही घोर अज्ञानच आहे. भ्रामक समजुतीतूनच लोक असा आततायीपणा करीत असतात. दिल्लीतील एकाच कुटुंबातील अकराजणांच्या आत्महत्येमुळे कंचन सिंहाच्या त्या आततायीपणाची पुन्हा आठवण झाली!

दिल्लीतील या कुटुंबातील सर्व अकराही सदस्य अत्यंत धार्मिक होते. त्यांच्या घरी अनेक वेळा भजन-कीर्तनासारखे कार्यक्रम होत असत. घराबाहेर रोज एका फळ्यावर श्‍लोक लिहून ठेवलेला असे. कुटुंबातील सर्व सदस्य वेगवेगळी व्रतवैकल्ये करीत असत. हे कुटुंब कुण्या जानेगदी नावाच्या भोंदू बाबाच्या नादी लागले होते, असा पोलिसांना संशय आहे. त्याच्या सांगण्यावरून ‘मोक्षप्राप्ती’साठी त्यांनी नीट नियोजन करून आत्महत्या केल्या, असे पोलिसांना वाटते. अर्थात, त्यांच्या अनेक नातेवाईकांना त्यांची हत्या झाली असावी, असेही वाटते. हे कुटुंब मूळचे राजस्थानचेच आहे. श्रीकृष्णाचे गिरीधर गोवर्धनधारी रुप असलेल्या श्रीनाथजीचे ते भक्‍त आहेत. मात्र, ते अंधश्रद्धाळू किंवा कुण्या भोंदूच्या नादी लागून मंत्रतंत्र करणार्‍यांपैकी नव्हते, असेही त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. शिवाय, कुटुंबात होणार्‍या एका लग्नाबाबत हे सगळे उत्सुक होते. मग, ते आत्महत्या का करतील, असाही त्यांचा सवाल आहे. कुटुंबातील ललित नावाची मानसिक संतुलन बिघडलेली एक व्यक्‍ती आपल्यामध्ये मृत पित्याचा संचार होतो व ते वेगवेगळे आदेश देतात, असा दावा करून एक आज्ञांचे ‘रजिस्टर’ लिहित होता, असेही म्हटले जाते. अशाच रजिस्टरमध्ये आत्महत्या कशी व कधी करावी, याबाबतचे लिखाण आढळलले आहे. या व्यक्‍तीनेच आपल्या पत्नीच्या मदतीने सर्वांची हत्या केली असावी, असाही संशय आहे. पोलिस तपासात यथावकाश सर्व काही स्पष्ट होईल. मात्र, हा प्रकार मोक्ष मिळावा म्हणून किंवा धार्मिक कारणासाठी घडला असेल तर, ती अत्यंत चिंताजनक अशीच बाब आहे. 

भारतीय संस्कृतीमध्ये जगाच्या पाठीवरील सर्वात जुने आणि कालातीत तत्त्वज्ञान समाविष्ट आहे. त्यामुळे ‘मोक्ष’ किंवा ‘मुक्ती’ची संकल्पनाही आपल्याकडे अतिशय सुस्पष्टपणे दिसून येते. साध्या भाषेत सांगायचे तर ‘स्वतःला स्वतःची पटलेली ओळख’ म्हणजेच मोक्ष. अशी ओळख पटल्यावर माणूस भ्रमातून ‘मुक्त’ होतो. देहालाच ‘मी’ समजणे हा भ्रम आहे. आपण म्हणजे या नाम-रुपापुरतेच मर्यादित एक विशिष्ट व्यक्ती नसून संपूर्ण चराचराला व्यापून राहिलेले अविनाशी, एकमेवाद्वितीय तत्त्व, परमचैतन्य आहोत ही ओळख पटणे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येणे हाच मोक्ष आहे. हिंदु तत्त्वज्ञान हे उपनिषदे, ब्रह्मसुत्रे आणि भगवद‍्गीता या प्रस्थानत्रयीवर आधारित आहे. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम्’ असे आपल्याकडे मानले जाते. कर्ममार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग किंवा ज्ञानमार्ग अशा कोणत्याही मार्गाने गेले तरी प्रत्यक्ष अनुभवजन्य असे जे ज्ञान मिळते त्यानेच मोक्ष मिळतो, अन्य उपाय नाही, असे अद्वैत सिद्धांत सांगतो. यावरूनच असे दिसते की भ्रामक संकल्पनेतून मुक्त होऊन आत्मस्वरुपाचा अनुभव येणे हाच जर मोक्ष असेल तर त्यासाठी मृत्यूची किंवा मृत्यूनंतरच्या जीवनाची वाट पाहण्याचीही गरज नाही. याच जन्मात, ‘याचि देही याचि डोळा’ असा अनुभव येऊन अनेक संतांनी मुक्ती मिळवली आहे. या मुक्तीला ‘जीवनमुक्ती’ म्हणतात व अशा जीवनमुक्त व्यक्तींना मृत्यूनंतर ‘विदेहमुक्ती’ मिळते. अर्थातच असे जीवनमुक्त होणे ही सहजसाध्य गोष्ट नाही. त्यासाठी ‘श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ’ किंवा ‘शाब्दे परेच निष्णात’ अशा सिध्दपुरुष असलेल्या सद‍्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य साधना करावी लागते. निष्काम सत्कर्माने चित्तावरील मल जातो, उपासनेने विक्षेप दोष जातो आणि ज्ञानानेच आत्मदर्शनावरील भ्रामक आवरण दूर होते. मल, विक्षेप आणि आवरण ही दोषत्रयी गुरूने सांगितलेल्या योग्य साधनेनेच जाते व त्यामुळे आत्मसाक्षात्कार होतो, असा तत्त्वविचार आहे. अर्थात, वर उल्लेख केल्याप्रमाणे गुरूही आधी शास्त्रज्ञानात पारंगत असावा लागतो आणि त्याला केवळ असे पुस्तकी ज्ञानच असून चालत नाही तर ‘अहं ब्रह्मास्मि’ किंवा ‘सर्वम् खलु इदं ब्रह्म’चा प्रत्यक्ष अनुभवही असावा लागतो. कुण्या भोंदूने किंवा मंत्र-तंत्र, जादुटोणा करणार्‍याने सांगितलेला अघोरी मार्ग कधीही मोक्षापर्यंत नेत नाही.

आत्महत्या किंवा दुसर्‍याची हत्या हे केवळ पापाचेच कारण होते, असेच शास्त्र सांगते. अर्धवट ज्ञान किंवा अज्ञान किती धोकादायक असते, हेच अशा काही घटनांवरून दिसून येते. भोळ्याभाबड्या, धार्मिक लोकांच्या भावनेशी खेळणारे अनेक तथाकथित बाबा, महाराज असतात. अनेक लोकांना मोक्ष किंवा ईश्‍वरप्राप्तीऐवजी भौतिक सुखांमध्येच रस असतो आणि आपल्या गरजा भागवण्यासाठीच त्यांना देव किंवा अध्यात्म हवे असते. काही लोक अत्यंत स्वार्थी आणि मत्सरी असतात व त्यांना स्वतःला काही हवे असण्यापेक्षा दुसर्‍याचे वाईट व्हावे, अशीच तीव्र इच्छा असते. असे काही लोक तांत्रिक-मांत्रिकांच्या नादी लागतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. भोंदू गुरू, तोतये अवतार, प्रेषित, मसिहा केवळ आपल्याच देशात आहेत, असे नाही. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अशा लोकांनी अधार्मिक कृत्ये करून समाजाची व धर्माचीही हानी केलेली आहे. अमेरिकेत जिम जोन्स नावाच्या एका माणसाने स्वतःला असाच अवतारी पुरुष घोषित केले होते. या स्वयंघोषित धार्मिक नेत्याने 1950 च्या दशकात इंडियाना प्रांतात ‘पिपल्स टेम्पल’ हा धार्मिक संप्रदाय स्थापन केला. काही वर्षांमध्येच तो बराच लोकप्रिय झाला आणि त्याला हजारो अनुयायी मिळाले. मात्र 1970 च्या दशकातच त्याच्यावर लैंगिक शोषण, लहान मुलांचा छळ, आर्थिक गैरव्यवहार अशासारखे अनेक आरोप होऊ लागले. त्यामुळे त्याने आपल्या अनुयायांसह अमेरिका सोडली आणि गयानातील एका निर्जन स्थानावर स्वतःचा ‘आश्रम’ स्थापन केला. हे ठिकाण एखाद्या नवीन वसवलेल्या शहरासारखेच होते व त्याला ‘जोन्स टाऊन’ म्हटले जाऊ लागले. हे जोन्स टाऊन सुमारे 3800 एकर जागेत पसरले होते. जोन्स स्वतःला ‘मसिहा’ म्हणवून घेत असे. या ठिकाणी त्याने आपल्या भक्त, शिष्य किंवा अनुयायांना अक्षरशः गुलामगिरीत ठेवले. तिथे सर्व आबालवृद्धांना दिवसभर अविरत कष्ट करावे लागत असत. याबाबत बनवलेल्या एका माहितीपटात तेथून सुटून आलेल्या काही लोकांनी तेथील छळाचे भयावह वर्णन केले आहे.

जोन्स टाऊनच्या काही भक्तांनी अमेरिकन संसद सदस्य लियो रेयान यांना या छळाची कल्पना देऊन आपली सुटका करण्याची विनंती केली. या जोन्स टाऊनची पाहणी करण्यासाठी आलेल्या रेयान यांची तिथे हत्या करण्यात आली. त्यानंतर खवळलेले अमेरिकन सरकार आता लष्करी कारवाई करणार, याची जाणीव होताच क्रुरकर्मा जोन्सने आपल्या अनुयायांना मृत्यूनंतरच्या दिव्य जीवनाची भ्रामक कथा सांगून आत्महत्येस प्रवृत्त केले व सायनाईड हे जहाल विष शीतपेयामध्ये मिसळून पिण्यास दिले. या घटनेत 918 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक तृतियांश लहान मुले होती. स्वतः जोन्सने विष पिले नव्हते. त्याचे शव मिळाले त्यावेळी त्याच्या डोक्यात गोळी झाडलेली आहे, असे दिसून आले. मृत्यूनंतर मिळणार्‍या ‘स्वर्गा’च्या अभिलाषेने जगात अनेक दहशतवाद्यांनी अनेकांचे हत्याकांड केले आहे. पेशावरमध्ये तर शंभराहून अधिक लहान मुलांचीही शाळेत हत्या करण्यात आली होती. अशा हत्यांनी किंवा भ्रामक कल्पनेतून केलेल्या आत्महत्यांनी स्वर्ग, मोक्ष किंवा ईश्‍वरप्राप्ती होईल, ही अपेक्षाच किती तकलादू आहे, हे कुणाही साधा विवेक असलेल्या माणसाला सहज समजू शकते. धर्म व धर्मग्रंथांचा खरा अर्थ समजून घेणे, भोंदुगिरी नष्ट करणे व अंधश्रद्धांच्या आहारी न जाणे या मार्गातूनच असा धर्माच्या नावाखाली सुरू असलेला उन्माद थांबू शकतो!


- सचिन बनछोडे