Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Kolhapur › लोकाभिमुख पोलिसिंग करा

लोकाभिमुख पोलिसिंग करा

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 04 2018 11:48PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत अधिकारी, कर्मचार्‍यांनी लोकाभिमुख पोलिसिंगला प्राधान्य देऊन जनमानसात पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, कर्मचार्‍यांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.

लाचखोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिस यंत्रणेला नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. हे प्रकार टाळण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारींच्या पहिल्याच बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. 

मावळते पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, आर. आर. पाटील, कृष्णात पिंगळे, सूरज गुरव, डॉ. प्रशांत अमृतकर आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख यांच्या हस्ते मावळते पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांचा गौरव करण्यात आला.

मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांनी खबरदारी घ्यावी. 9 ऑगस्ट क्रांतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहर, जिल्ह्यात सामाजिक, राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून सक्रिय राहावे, असेही त्यांनी आवाहन केले. प्रामाणिकपणे कामगिरी बजावणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पाठीशी आपण भक्कम राहू. जिल्ह्यात पोलिस यंत्रणेची आदर्शवत टीम निर्माण करण्यासाठी सार्‍यांनीच पुढाकार घ्यावा.

लाचखोरीच्या कारवाईत जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी रंगेहाथ सापडल्याची माहिती मिळाली. हा प्रकार यंत्रणेलाच नव्हे,तर संबंधित पोलिस कुटुंबालाही मनस्ताप करणारा ठरतो. क्षणिक मोह टाळा. यंत्रणेशी प्रामाणिक रहा.अधिकाराचा गैरवापर टाळा.लाचखोरीच्या घटना टाळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

यावेळी संजय मोहिते, काकडे, घाटगे, आर.आर.पाटील, पिंगळे. सतिश माने, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत,औंदुबर पाटील, मानसिंह खोचे, शहाजी निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातर्गंत प्रभारी अधिकार्‍याकडून मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर शांतता- सुव्यवस्थेचा आढावा घेतला.