Sun, Nov 18, 2018 21:54होमपेज › Kolhapur › सुमित्रा भावे, नितीन देसाई यांना पुरस्कार

सुमित्रा भावे, नितीन देसाई यांना पुरस्कार

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 1:07AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कलामहर्षी बाबुराव पेंटर  पुरस्कार सुमित्रा भावे व चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार नितीन चंद्रकांत देसाई यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.   दि. 14 ते 21 डिसेंबर या कालावधीत कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी घई  यांच्या हस्ते नवोदित चित्रकर्मींसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. 

दि. 14 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.  यावेळी माधव शिंदे दिग्दर्शित ‘किल्‍ले रायगड’ हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. याशिवाय चित्रपट निर्मितीबाबत ‘एफटीआय’चे संचालक भूपेंद्र कंथोला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जागतिक विभाग, विविध भारती, लक्षवेधी देश, दिग्दर्शक मागोवा, मायमराठी विभाग, आदरांजली विभाग, श्रद्धांजली , विशेष चित्रपट   व लघुपट अंतर्गत रोज देश-विदेशातील चित्रपट दाखवले जाणार आहेत. सर्व कार्यक्रम सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत शाहू स्मारक भवन येथे होणार आहेत. रोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत  चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्‍तींशी मुक्‍त संवाद कार्यक्रम होणार आहे.  

दि  21 डिसेंबर रोजी  सायंकाळी साडेपाच वाजता नितीन देसाई यांना आनंदराव पेंटर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या  चित्रपटांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
यावेळी कोल्हापूर चित्रनगरीचे संचालक संजय पाटील यांनी, कोल्हापूरची चित्रनगरी पुढील महिन्यात चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले. एकूण 22 ते 25 लोकेशन तयार करण्यात आली आहेत. जास्तीत जास्त निर्मात्यांनी येथे येऊन चित्रीकरण करावे, यासाठी चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगितले. यावेळी दिलीप बापट उपस्थित होते.