Sun, May 26, 2019 19:19होमपेज › Kolhapur › तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:37AMनंदगाव : वार्ताहर 

नंदगाव (ता. करवीर) येथील संदीप शामराव साजणे (वय 28) या तरुणाने गगनबावड्यातील मुटकेश्‍वर गावी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेयसीच्या वडिलाच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या चिठ्ठीतून समोर आले आहे. याप्रकरणी प्रेयसी आणि तिच्या वडिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप साजणे याचे गगनबावडा तालुक्यातील ऋतुजा पाटील हिच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु, त्याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. याच कारणातून संदीपने मुटकेश्‍वर गावी जाऊन आनंदा विष्णू पाटील (रा. मुटकेश्‍वर, ता. गगनबावडा) यांच्या घराच्या पाठीमागे फणसाच्या झाडाला गळफास लावून घेतला. तत्पूर्वी, संदीपने आपल्या मित्रांना गळफास लावून आत्महत्या करीत असल्याचे संदेशही पाठविल्याचे समोर आले. मंगळवारी सकाळी त्याच्या आत्महत्येची वर्दी पोलिसपाटलांनी गगनबावडा पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला आणून नातेवाइकांना फोन केला.

आपल्या भावाने आत्महत्या केली नसून, त्याचा घातपात झाल्याचा आरोप त्याच्या भावाने केला. याप्रकरणी निवास पाटील व ऋतुजा निवास पाटील (रा. मुटकेश्‍वर, ता. गगनबावडा) यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाइकांनी पवित्रा घेतला. यामुळे सीपीआरमध्ये तणाव निर्माण झाला. गगनबावडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भागवत यांनी गुन्हा नोंद केला. याची माहिती नातेवाइकांना दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. ऋतुजा व तिच्या वडिलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.प्रेमसंबंधातून संदीप साजणे हा 25 एप्रिलपासून घरातून जाऊन ऋतुजा पाटील हिच्यासोबत राहत होता. मुलीचे वडील निवास पाटील वारंवार फोनवरून संदीपचा भाऊ सचिन साजणे याला धमकी देत असे. संदीपलाही तो धमकी देत असे, अशी माहिती भाऊ सचिन याने दिली.

मित्रांना संदेश 

सोमवारी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी संदीप साजणे याने ‘मी आज जीव देत आहे ऋतुजा पाटीलच्या घरामागे,’ असा संदेश सर्व मित्रांना केला होता. त्याच्या घरातील साहित्यामध्ये चिठ्ठी सापडली यामध्ये माझे काही बरे-वाईट झाल्यास निवास पाटील व ऋतुजाचा मामा, काका, तसेच योगेश नलवडे (पु. शिरोली) हे सर्वजण जबाबदार असतील, असे लिहून ठेवलेले आहे.संदीप हा शहरात दूध विक्री करीत होता. ऋतुजा ही कॉलेजला कोल्हापूरमध्ये होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता; पण याला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता.