Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Kolhapur › पोलिस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न; एक ताब्यात

पोलिस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न; एक ताब्यात

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 11 2018 11:40PMकोल्हापूर : प्रतिनिधी

चोरीची तक्रार नोंदवून घ्या, नाही तर आत्महदन करण्याची धमकी देत एकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच अंगावर डीझेल ओतून घेतले. ज्ञानसागर ऊर्फ अंगद नामदेव कोंडरे (वय 32, रा. बोंद्रेनगर) असे त्याचे नाव आहे. ठाणे अंमलदारांसह इतर पोलिसांनी धाव घेत त्याच्या हातातील काडेपेटी व बाटली हिसकावून घेतली. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या प्रकाराने पोलिसांची तारांबळ उडाली.

ज्ञानसागर कोंडरे हा बोंद्रेनगर परिसरात राहण्यास आहे. याच परिसरातील ओंकार तडुळे हा  वाढदिवस साजरा  करण्यासाठी 4500 हजार रुपयांची मागणी करीत होता. याला नकार दिल्याने तडुळे याने ज्ञानसागरला गुरुवारी दुपारी मारहाण केली तसेच घरच्यांना मारण्याची धमकी दिली. याबाबत कोंडरे याने पोलिसांत माहिती दिल्याने तडुळेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्री अकराच्या सुमारास पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून ओंकार तडुळेने घरात घुसून मारहाण केल्याने ज्ञानसागर कोंडरे पुन्हा पोलिस ठाण्यात आला. त्याने घडलेला प्रकार सांगून गळ्यातील सोन्याची चेन तडुळे याने काढून घेतल्याचे सांगितले. पोलिस त्याच्याकडून अधिकची माहिती घेत असतानाच ज्ञानसागर कोंडरे चिडून पोलिस ठाण्याबाहेर गेला. 

आत्मदहनाचा प्रयत्न
ओंकार तडुळेविरोधात गुन्हा दाखल करा, नाही तर मी पेटवून घेणार अशी धमकी देत कोंडरेने स्वत:सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेतले. हा प्रकार पाहताच पोलिस ठाण्यात उपस्थित पोलिसांनी कोंडरेकडे धाव घेतली. त्याच्या हातातील डिझेलची बाटली व काडेपेटी हिसकावून घेतली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.

जबरी चोरीचा गुन्हा नोंद
ज्ञानसागर कोंडरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार ओंकार अरुण तडुळे (वय 30, रा. बोंद्रेनगर) याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर जबरी आणि मारहाणप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोंडरेवरही गुन्हा दाखल
कोंडरे याने पोलिस ठाण्याच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावरही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.