Wed, Feb 20, 2019 02:29होमपेज › Kolhapur › जाहीर दर देणार की कपात?

जाहीर दर देणार की कपात?

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 12:41AMभडगाव : एकनाथ पाटील

साखर कारखान्यांनी बाजारपेठेतील साखरेच्या घसरत्या दरावर बोट ठेवत पहिला हप्‍ता तीन हजार रु. देण्यास असमर्थता दाखवत 2,500 रु. दिल्याने ऊस उत्पादकांत तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान,  सीमाभागातील कारखान्यांकडून पहिली उचल सरासरी 3,151 रु. ते 3,000 दिली आहे. नंतर एक महिन्याची ऊस बिले या कारखान्यांनी दिलेली नाहीत. परिणामी, हे कारखानेदेखील पहिल्या उचलीत कात्री लावणार की एकरकमी पहिली उचल देणार, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील  साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा 200 रु. अधिक दिल्याने ऊस उत्पादकांत समाधानाचे वातावरण  होते. यावर्षी आंदोलनाशिवाय ऊस दर मिळाल्याने साखर कारखाने वेळेत सुरू झाले. ऊस पळवा-पळवीतही साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती. परंतु, गेल्या आठवड्यापासून  प्रतिटन 2,500 रु. पहिली उचल देण्यास सुरुवात केली असून, ऊस उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा दर जाहीर होण्यापूर्वीच एक महिना अगोदर कर्नाटकातील हालसिद्धनाथ साखर कारखान्याने विनाकपात पहिला हप्‍ता 3,151 रु., हिरण्यकेशी-संकेश्‍वर साखरने 3,100 रु., व्यंकटेश्‍वरा बेडकिहाळने 3,000 रु. दर देत जिल्ह्यातील उसाची उचल केली आहे. राज्यात साखर कारखानदारांनी शेतकरी व संघटनांना विचारात न घेता जाहीर केलेल्या ऊस दरात पाचशे रु. कपात केल्याने ऊसकरी शेतकर्‍यांकडून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.