Sat, Feb 16, 2019 12:41होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याने गुर्‍हाळांना घरघर

शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याने गुर्‍हाळांना घरघर

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:28PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये हंगामाच्या अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे  ऊस कमी पडू लागल्याने गुन्हाळघरांना घरघर लागली आहे. गुळाला मुहूर्ताच्या सौद्यात चांगला दर मिळतो; मात्र त्यानंतर पूर्ण हंगामात अपवादानेच चांगला दर पदरात पडतो; अन्यथा दर पडलेलाच असतो. त्यातून गूळ उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसानच होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ऊस उत्पादक शेतकर्‍यांनीही गुर्‍हाळांकडे पाठ फिरवली आहे.

साखरेचे दर उतरल्याने साखर कारखान्यांनी पहिली उचल प्रतिटन 2500 रुपयांचीच देण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित रक्कम साखरेला चांगला दर मिळाल्यानंतर देण्याची भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे प्रतिटनाला 650 ते 700 रुपयांचा फटका बसत असतानाही शेतकर्‍यांनी गुर्‍हाळघरांएवजी कारखान्यांनाच पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच गुर्‍हाळघरे सुरू आहेत.   

उसासाठी साखर कारखान्यांमध्ये सुरू झालेल्या अघोषित स्पर्धेमुळेही गुर्‍हाळघरांना ऊस मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे गुर्‍हाळमालकांना ऊस चढ्या दराने विकत घ्यावा लागत आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात या मालकांनी राखून ठेवलेला स्वतःचाच ऊस गाळण्यासाठी सुरुवात केली आहे. बाजारपेठेत गुळाचे दर वाढले आहेत. सध्या गुळाचा दर तीन हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे.  दर चांगला, पण ऊस कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

अनेक गुर्‍हाळमालक आपला गूळ किरकोळ विक्रीने स्थानिक बाजारात विकत  आहे. गुर्‍हाळघरात 30 किलोंच्या रव्याऐवजी 10, 5, 2, 1 किलोचे रवे तयार केले जात आहेत. अनेक गुर्‍हाळघरात काकवी, गुळवड्या किरकोळ विक्रीसाठी ठेवल्या आहेत. होलसेल व किरकोळ विक्री करून गुर्‍हाळमालक कसाबसा उत्पादन खर्च भागवत आहेत.