Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Kolhapur › हंगाम लांबणार? वाहनधारकांना कोट्यवधींचा फटका

मजूर टंचाईचे संकट

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:00AM

बुकमार्क करा

कौलव : राजेंद्र दा. पाटील

साखर कारखान्यांच्या हंगामाला वेग आला असला, तरी यावर्षी ऊसतोडणी मजुरांच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गाळप क्षमतेएवढा ऊस आणताना कारखान्यांची दमछाक होत असून, अनेक कारखान्यांचे वाहनतळ रिकामे दिसत आहेत. 

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने गाळपासाठी  किमान 675 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यातच गाळपाच्या स्पर्धेतून उसाची पळवापळवी सुरू झाली आहे. दरवर्षी बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर व सोलापूर जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर येतात. तसेच प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक टोळ्याही मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी करतात. 

मराठवाड्यात नियमित पावसासह परतीचा पाऊस जोरदार झाल्यामुळे यावर्षी मजूर आलेलेच नाहीत. अनेक टोळ्या स्थानिक कारखान्यांकडेच गेल्या आहेत. अन्य राज्यांत विशेषतः गुजरातमध्ये ऊसतोडणी-ओढणीचे दर वाढवल्यामुळे अनेक टोळ्या त्या राज्यांकडे वळल्या आहेत. ऊसतोडणी मजुरांची मुले नोकरी-उद्योगांकडे वळली आहेत. त्यामुळेही मजुरांची संख्या रोडावली आहे. बहुतांश कारखान्यांचे वाहनतळ रिकामे पडत असून, काही कारकान्यांना क्षमतेपेक्षा कमी ऊस गाळप करावे लागत आहे. परिणामी, कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जे मजूर उपलब्ध आहेत. ते ऊस उत्पादकांना वेठीला धरून ऊसतोडणी करायला भाग पाडत आहेत. बर्‍याच ठिकाणी बिदागीपोटी पैशाची मागणी करत आहेत. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीला आले आहेत. 

वाहनधारक संकटात

यावर्षी मराठवाड्यातील अनेक टोळ्या आलेल्या नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांनी प्रत्येकी तीन ते पाच लाख रुपये आगाऊ रक्‍कम (अ‍ॅडव्हान्स) दिली आहे. मात्र, या टोळ्यांनीच टांग मारल्याने वाहनधारकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे वाहनधारक आता मराठवाड्यात हेलपाटे मारत आहेत. स्थानिक टोळ्यातही पुरेसे मजूर नसल्याने वाहनधारकांची पुरेशी ओढणी होत नाही. त्यामुळे त्यांनाही आर्थिक फटका बसला आहे.