Mon, Jun 24, 2019 21:43होमपेज › Kolhapur › कोरडवाहू प्रदेशात ऊस पिकास अटकाव?

कोरडवाहू प्रदेशात ऊस पिकास अटकाव?

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:39AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

महाराष्ट्र शासनाने कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये जादा पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिबंध करण्यासाठी लागवडीपूर्वी अनुमती घेण्याचे बंधन घालणारे धोरण प्रस्तावित केले आहे. यामुळे राज्यातील ऊस आणि केळी उत्पादक शेतकर्‍यांना यापुढे कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये पिके घेताना खबरदारी घ्यावी लागेल, अन्यथा अनुमतीशिवाय घेतलेल्या पिकांच्या नुकसानीची जबाबदारी त्यांना स्वतः स्वीकारावी लागणार आहे. 

महाराष्ट्र शासनाने नुकताच पाणी वापराच्या धोरणाविषयी एक मसुदा प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यामध्ये कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये पीक घेताना अनुमतीसाठी एक तालुकास्तरावर समिती प्रस्तावित करण्यात आली आहे. या समितीची अनुमती शेतकर्‍यांना पिकाच्या लागवडीपूर्वी घ्यावी लागेल. ही समिती कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये कार्यरत राहणार असून समितीलाही शेतकर्‍यांनी अनुमती मागितल्यापासून 30 दिवसांच्या आत त्याचा अर्ज मंजूर वा नामंजूर कळविण्याचे बंधन आहे. या धोरणाच्या मसुद्यावर राज्य शासनाने 30 दिवसांमध्ये हरकती मागविल्या आहेत. हरकतींचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर हे धोरण अस्तित्वात येईल. यानंतर मात्र डोंगरावर ऊस लावण्याच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना आपल्या हौसेला लगाम घालावा लागणार आहे. 

भूजल पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी धोरणाची आखणी
भारतातील कोरडवाहू ठिकाणांचे एक सर्वेक्षण घेण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्रात 1531 ठिकाणे कमी भूजल पातळीची म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी शेतकरी नगदी पिके घेण्याचा प्रयत्न करतात आणि पिकांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्यामुळे संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागते. या शेतकर्‍यांना अटकाव करण्यासाठी भारतीय विद्युत कायद्यात बदल सुचविणारे एक विधेयक नुकतेच लोकसभेच्या पटलावर सादर करण्यात आले होते. यामध्ये कमी पाण्याच्या प्रदेशात अधिक वीज दर प्रस्तावित केला होता. जेणेकरून विजेच्या वापर करून भूजलाची पातळी आणखी कमी करू नये, असे धोरण यामागे अभिप्रेत होते. हे धोरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर असताना आता महाराष्ट्र शासनानेही पाण्याच्या यथायोग्य नियोजनाचा प्रश्‍न हाती घेतला आहे.