Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Kolhapur › ताळेबंद जुळवताना कारखान्यांची कसरत

ताळेबंद जुळवताना कारखान्यांची कसरत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कौलव : प्रतिनिधी

यावर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीही साखर दरातील घसरण कायम राहिल्याने मार्च अखेरीस ताळेबंद जमवताना कारखान्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. जागतिक व देशांतर्गत बाजार पेठेतील घसरलेले दर अतिरिक्त साखर उत्पादन व ठप्प झालेली साखर विक्री यामुळे ऊस बिलेही थकली आहेत. परिणामी गोड साखरेची चव कडू बनू लागली आहे. 

देशातील साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील साखर उद्योग यंदाच्या हंगामात आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. यावर्षीचा हंगाम हा उसाचे बंपर पीक असणारा ठरला आहे. प्राथमिक टप्प्यात 250 लाख टनापर्यंत साखर उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र हेच उत्पादन 295 लाख टनापर्यंत जाणार आहे. गतवर्षीची 40 लाख टन साखर शिल्लक असून देशांतर्गत वापर 250 लाख टन आहे. त्यामुळे आगामी हंगामाच्या सुरुवातीलाच 95 लाख  टन साखर शिल्लक असणार आहे. यंदा एफ. आर. पी चा टक्का उंचावला असून शेतकरी संघटना व शासनाशी झालेल्या करारानुसार कारखान्यांनी एफ. आर. पी. पेक्षा दोनशे रुपये प्रती टन दर जादा दिला आहे.  हंगामच्या प्रारंभी खुल्या बाजारातील साखरेचा दर प्रती क्विंटल 3600 ते 3700 रुपये होता. मात्र त्यानंतर सातत्याने दरात घसरण झाली आहे. मध्यंतरी राज्य शासनाने कारखान्यांकडील 25 टक्के साखर 3200 रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. तसेच आयात शुक्‍ल वाढवून निर्यात शुक्‍ल घटवले होते.  त्यामुळे साखर दरात प्रती क्विंटल 200 रुपयांची वाढ झाली होती. मात्र ही वाढ म्हणजे केवळ तात्पुरती सुजच ठरली आहे. 

जानेवारीच्या पहिल्या पंधरावड्यात 3350 रुपयांपर्यंत असणारा साखरेचा दर गेल्या पंधरवड्यात 2900 ते 3050 पर्यंत खाली घसरला आहे. मध्यंतरी विक्री झालेली साखर उचलण्यास व्यापारी तयार नाहीत. 

ऑक्टोबर, नोव्हेंबर वगळता यंदा साखरेचा दर तीन हजार रुपयांपर्यंतच राहिला आहे. मोलॅसिस बगॅसचे दरही घसरले आहेत. वाढलेली एफ. आर. पी. घसरलेले दर या पार्श्‍वभूमीवर ऊसदर द्यायचा कसा? या विवंचनेत कारखानदार आहेत. बहुतांशी कारखान्यांची महिनाभराची ऊस बिले थकली असून नोकर पगार व्यापारी तसेच तोडणी वाहतुकीची बिलेही थकली आहे. घसरलेली व अंदाजापेक्षा वाढलेली साखर यामुळे  बँकाही अडचणीत सापडल्या आहेत. 

मार्चअखेरीस आर्थिक वर्षाचा ताळेबंद जमवताना कारखान्यांच्या नाकी नऊ आले आहे. ऊस बिले वेळेत नसल्याने सेवा संस्थांच्या थकबाकीचाही प्रश्‍न कायम आहे. साखर उचलली नसल्याने पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कारखानदारही हवालदिल झाले आहेत. शासनाने वीस लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला आहे. मात्र जागतिक बाजारात  साखरेचा दर प्रती क्‍विंटल 2300 रुपयांच्या आसपास आहेत. परिणामी निर्यातीला किमान प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी होत आहे. बहुतांशी कारखान्यात शासनाने 2014-15 व 2015-16 च्या हंगामातील एफ. आर. पी. च्या कर्जाची परतफेड करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरीस साखर उद्योगात आर्थिक आणीबाणीचे संकट उभे ठाकले आहे. अडकित्यात सापडलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी साखर निर्यात सुरू करण्याबरोबरच एफ. आर. पी. अनुदानपेटी प्रती टन तीनशे रुपये शासनाने देण्याची मागणी साखर उद्योगातून होत आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Sugarcane bills, tired, extra sugar, production, sale


  •