Thu, Jul 18, 2019 21:43होमपेज › Kolhapur › तुम्हीच सांगा, आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे?

तुम्हीच सांगा, आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे?

Published On: Feb 02 2018 1:32AM | Last Updated: Feb 01 2018 9:46PMआजरा : प्रतिनिधी

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखरेचे दर घसरल्याचे कारण पुढे करत साखर कारखानदारांनी पहिला हप्‍ता 2500 रुपयांचा देण्याचे जाहीर केले आहे. जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व राजकीय नेतेमंडळी व त्यांच्या कार्यकर्त्यांचे ऊस कारखान्याला गेले आहेत. शिल्लक ऊस हा सर्वसामान्य शेतकर्‍यांचा आहे. बहुतांशी कारखान्यांनी यापूर्वी गाळप झालेल्या उसाला 3 हजार प्रमाणे पहिली उचल दिली असताना मुळातच ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍याचे आता पहिल्या हप्त्यातून किमान 500 रुपये कमी होणार असल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तुम्हीच सांगा, आता आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा सवाल ऊस उत्पादक शेतकर्‍यांतून केला जात आहे.

ज्यांनी यापूर्वी वेळेत ऊस पुरवठा केला ते मात्र किमान 3 हजार रुपयांची पहिली उचल घेऊन रिकामे झाले आहेत. यामध्ये प्राधान्याने ज्या-त्या भागातील स्थानिक नेतेमंडळी व त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ज्यांचा ऊस गेलेला नाही तो शेतकरी रात्रंदिवस उसाला पाणी देण्यापासून ते शेती ऑफिसचे उंबरे झिजवण्यापर्यंत प्रयत्नशील आहे. कारखान्याकडून जादा दर अपेक्षित असताना हा 500 ते 600 रुपयांचा फटका शेतकर्‍यांचे अर्थकारण विस्कटणारा आहे. साखर दरात घसरण झाल्याने एफआरपी घटविण्यात आला आहे. मात्र, जेव्हा साखर दरात वाढ झाली तेव्हा कारखानदारांनी एफआरपी का वाढवली नाही, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

...अन् जात्यातले रडले

कारखानदारांच्या एफआरपी घटविण्याच्या निर्णयाने ज्यांचा ऊस यापूर्वी गाळप झाला आहे ती मंडळी खुशीत असून ज्यांचा ऊस गाळप व्हायचा आहे ते शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. यावरून सुपातले हसत आहेत आणि जात्यातले रडत आहेत, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.