Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Kolhapur › साखरेचा साठा पडून;  70 कोटींची उलाढाल ठप्प

साखरेचा साठा पडून;  70 कोटींची उलाढाल ठप्प

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 चक्काजाम आंदोलनामुळे जिल्ह्यातील आवक व जावक पूर्णत: बंद असून, साखरेवरील निर्यातीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील घाऊक व्यापार्‍यांकडील साखर पडून असून, अंदाजे 70 ते 80 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.कांद्याची आवकही थांबली आहे. सरकारकडून  अजून कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वाहतूक संघटनेने दिला आहे. 
 नियमित होणारी डिझेल-पेट्रोलची दरवाढ रद्द करावी, टोल प्रक्रिया पारदर्शक करावी, थर्ड पार्टी प्रिमियममधील वार्षिक दरवाढ रद्द करा, पर्यटन वाहनांसाठी दीर्घ मुदतीचे ऑल इंडिया परमिट द्यावे, जीएसटी ई- बिलातील अडचणी व भाडे देण्यासाठी होणारा विलंब यात सुधारणा करावी, या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी  ऑल इंडिया मोटर्स ट्रान्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य ट्रक-टेंपो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने 20 जुलैपासून  देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. 

 या आंदोलनाची झळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली नसली तरी व्यापारी वर्गाला याचा फटका बसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या डाळींची आवक होते. चक्काजाम आंदोलनाची घोषणा आगोदरच केल्याने कडधान्याचा बर्‍यापैकी साठा करून ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून अन्य राज्यांत मोठ्या प्रमाणात साखर पाठवली जाते. तामीळनाडू, केरळ, मदुराई व दक्षिणमधील अन्य राज्यांतही साखरेचे किमान दीडशे ट्रक दक्षिण भारतात जातात. पण, चक्का जाम आंदोलनामुळे या राज्यांतून आलेले ट्रक आहे तेथेच थांबून आहेत. ऐन पावसाळ्यात साखर पाठवण्यास अडचणी निर्माण होत असल्याने  व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. पावसात साखरेला पाणी लागल्यास आणखी नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. 

 साखरेबरोबरच बाजार समितीत होणार्‍या कांदा, बटाट्याची आवकही मंदावली आहे. कोल्हापूर बाजार समितीत दररोज 20 ते 25 ट्रक कांद्याची आवक होते. पण, चक्काजाम आंदोलनामुळे ही आवक कमी झाली आहे. मंगळवारी केवळ तीनच ट्रक बाजार समितीत दाखल झाले. बटाट्याची आवकही मंदावल्याने किरकोळ बाजारपेठेत कांदा, बटाट्याचा किलोचा दर वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या भरारी पथकाने  विविध ठिकाणी पाहणी केली.  शासनाने कोणताच तोडगा काढला नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा  सुभाष जाधव यांनी दिला आहे.