Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Kolhapur › साखरेचा दर घसरला

साखरेचा दर घसरला

Published On: Dec 02 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 12:00AM

बुकमार्क करा

कौलव : राजेंद्र दा. पाटील 

महिनाभरापूर्वी खुल्या बाजारात साखरेचा दर प्रतिक्‍विंटल 3550 ते 3650 रुपयांदरम्यान होता; मात्र हंगाम सुरू होताच साखर दरात घसरणीला सुरुवात झाली आहे. सध्या हाच दर 3350 रुपयांपर्यंत खाली आला आहे. साखरेला आवश्यक तेवढा उठावही नाही. त्यामुळे अनेक कारखान्यांनी खुली विक्री (ओपन टेंडर) ठेऊनही व्यापारी साखर खरेदीसाठी फिरकतही नाहीत. त्यामुळे दर आणखी घसरण्याच्या चिंतेने साखर कारखानदार चिंताग्रस्त झाले आहेत.

खुल्या बाजारात साखरेच्या दर घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात घट केली. त्यामुळे साखर कारखान्यांच्या अर्थकारणाला धक्‍का बसू लागला आहे. यंदा तसेच आगामी हंगामात  जादा साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखरेचे दर आणखी घसरण्याची भीती व्यक्‍त होत असून, साखरेच्या हमीभावासह बफर स्टॉकचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

देशात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योग हा दुसर्‍या क्रमांकाचा उद्योग आहे; मात्र ठोस विक्री धोरणाचा अभावामुळे उत्पादनातील कमी-अधिक उत्पादनाचे चक्र यामुळे साखर उद्योगाचे अर्थकारण सतत हेलकावे खात आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला सातत्याने चढ-उतार अनुभवावे लागत आहेत. गत हंगामात देशात 201 लाख मेट्रिक टन, तर राज्यात 42 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. यंदा देशात 253 लाख टन, तर राज्यात 73 लाख टन साखर उत्पादन होणार आहे. देशात 49 लाख 88 हजार हेक्टर, तर राज्यात 9 लाख 82 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसपिक आहे. राज्यातील 160 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. 

यंदाच्या व आगामी हंगामातील संभाव्य अतिरिक्‍त साखर उत्पादनामुळे साखर दर आणखी घसरून कारखाने शॉर्ट मार्जिनच्या (अपुरा दुरावा) तडाख्यात सापडण्याचा धोका उभा राहिला आहे. साखर उद्योगासमोरील या आर्थिक संकटामुळे हमीभाव व साखरेच्या बफर स्टॉकचा (राखीव साठा) प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साखरेच्या एकूण वापरापैकी 75 टक्के व्यापारी कारणासाठी व 25 टक्के घरगुती कारणासाठी वापर होतो. तरीही साखरेचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश आहे.

त्यामुळे साखरेला या यादीतून वगळून व्यापारी व घरगुती वापरासाठी दोन वेगवेगळे दर (डबल प्राईस सिस्टीम) लावावेत, अशी मागणी होत आहे. 1979 साली केंद्राने काही काळ साखरेला हमीभाव बांधून दिला होता. हा प्रयोग पुन्हा राबवण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच साखर उद्योगातील अडचणीच्या काळात साखरेचा बफर स्टॉक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय वापरल्यास कारखान्यांवरील व्याजाचा भुर्दंड कमी होणार आहे. दरातील घसरणीमुळे बसलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्राने  साखरेला हमीभाव देऊन बफर स्टॉक करावा; अन्यथा साखरेचे अर्थकारण बिघडल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती साखर उद्योगातून व्यक्‍त होत आहे.