Thu, Apr 25, 2019 18:41होमपेज › Kolhapur › गतहंगामापेक्षा साखर उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले!

गतहंगामापेक्षा साखर उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले!

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 11:03PM

बुकमार्क करा
कुडित्रे : प्रतिनिधी 

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या देशाच्या 2017-18 या साखर वर्षात साखरेचे उत्पादन 69.4 लाख मे. टन झाले आहे. हंगाम सुरुवातीच्या पहिल्या अडीच महिन्यांच्या कालावधीतच उत्पादनातील ही वाढ 30 टक्के अधिक आहे. 

साखर उत्पादकांच्या अखिल भारतीय संघटन संस्था असलेल्या ‘ईस्मा’ने ही माहिती दिली आहे. 2017-18 च्या हंगामात 15 डिसेंबरपर्यंत देशात 69.40 लाख मे. टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत हे साखर उत्पादन 53.46 लाख मे. टन होते. 

‘ईस्मा’ने दिलेल्या माहितीनुसार, देशात 469 साखर कारखाने उसाचे गाळप करीत आहेत. गेल्या हंगामात 449 साखर कारखाने सुरू होते. त्यावेळी 203 लाख मे. टन साखर उत्पादन झाले होते. या हंगामात हे साखर उत्पादन 251 लाख मे. टन होईल, असा अंदाज आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात गेल्या हंगामात या कालावधीदरम्यान 17.66 लाख मे. टन असणारे साखर उत्पादन 23.37 लाख मे. टनावर पोहोचले आहे.

तर कर्नाटकने 11.5 लाख मे. टन उत्पादन करून गेल्या हंगामाची आकडेेवारी गाठली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखर उत्पादनाची स्थिती अत्यंत चांगली असल्याने, देशाचे एकूण उत्पादन 23 ते 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज ‘ईस्मा’ने व्यक्‍त केला आहे. महाराष्ट्राचे साखर उत्पादन तब्बल 71 टक्क्यांनी वाढून ते 72 लाख मे. टन होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे उत्पादन 24 टक्क्यांनी वाढून ते 26 लाख मे. टन होईल.