Mon, Apr 22, 2019 21:37होमपेज › Kolhapur › साखर दरात पुन्हा घसरण

साखर दरात पुन्हा घसरण

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:21AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

केंद्र सरकारने प्रतिक्विंटल साखरेचे दर 2,900 रुपये निश्‍चित केल्यानंतर 3,200 रुपयांवर पोहोचलेल्या साखरेच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. दर तर कमी झालेच; पण मागणीही ठप्प झाल्याने कारखानदारांसमोर पुन्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी साखरेचे उत्पादन अंदाजापेक्षा जास्त झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तर यावर्षी साखर उत्पादन दुप्पट झाले आहे. त्यामुळे साखरेचे दर प्रतिक्विंटल 2,500 रुपयांपर्यंत खाली आले. उसाची एफआरपी देताना साखरेचा दर प्रतिक्विंटल 3,200 रुपये गृहीत धरला होता; पण प्रत्यक्ष बाजारातील दर व एफआरपीचा दर यात प्रतिक्विंटल 700 रुपयांचा फरक पडल्याने बहुंताशी कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले होते. बँकांनी या कारखान्यांना दिलेली कर्जे 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस थकीत राहिली असती, तर ही कर्जे एनपीएत धरावी लागली असती, त्यामुळे बँकांही अडचणीत आल्या असत्या. 

यावर मार्ग काढण्यासाठी देशभरातील साखर उद्योगांकडून काही मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. त्यात साखरेचा हमीभाव निश्‍चित करावा, कारखान्यांवर साखर विक्रीचे निर्बंध आणावेत, बफर  स्टॉकला परवानगी द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता. 6 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत साखरेचा दर प्रतिक्विंटल 2,900 रुपये निश्‍चित करण्याबरोबरच कारखान्यांवर साखर विक्रीचे निर्बंध, 30 लाख टन बफर स्टॉक करणे या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे साखरेचे दर झपाट्याने वाढले. कालपर्यंत हे दर प्रतिक्विंटल 3,200 रुपये होते, आज मात्र या दरात घसरण होऊन ते 2,940 रुपयांपर्यंत खाली आले.  

साखरेचे दर कमी असताना मोठ्या व्यापार्‍यांनी विशेषतः सट्टोडियांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी केली होती. ही साखर या व्यापार्‍यांकडून 2,900 रुपये दराने बाजारात आणल्याने दरात घसरण झाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजूनही कारखानदारांकडे यावर्षीच्या हंगामातील निम्म्याहून अधिक साखर गोदामातच आहे.