Thu, May 23, 2019 04:22होमपेज › Kolhapur › साखरेला प्रतिक्‍विंटल १ हजार अनुदान द्यावे

साखरेला प्रतिक्‍विंटल १ हजार अनुदान द्यावे

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:45PMकोल्हापूर : प्रतिनिधी

साखरेचे दर कमी झाल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले आहेत. एफआरपीप्रमाणे उत्पादकांना दर देऊ शकत नाहीत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनांनी तातडीने निर्णय घेऊन साखरेला प्रतिक्‍विंटल 1 हजार रुपये अनुदान द्यावे, साखरेचा बफर स्टॉक करावा, राज्य शासनाने प्रतिक्‍विंटल 3200 दराने साखर खरेदी करावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. 

आ. मुश्रीफ म्हणाले, या हंगामात उत्पादित झालेल्या साखरेतील 12 टक्के साखर फक्‍त विक्री झाली आहे. उर्वरित सर्व साखर दर नसल्यामुळे कारखान्यांच्या गोदामात पडून आले. पुढील वर्षी उसाचे उत्पादन दीडपट अधिक होणार असल्याचे सांगितले जाते. त्यातच सध्या साखरेला दर कमी मिळू लागला आहे. त्यामुळे साखर उत्पादन खर्च आणि तोडणी ओढणीचा खर्च वजा जाता साखरेला दर कमी मिळू लागला आहे, यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. 

हंगामाच्या सुरुवातील साखरेला दर चांगला होता. त्यामुळे पहिले तीन ते चार पंधरवडे उसाला प्रतिटन 3 हजार रुपये दर शेतकर्‍यांना देता आला. त्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली. त्यामुळे साखर कारखानदारांनी एकत्र येऊन 2500 रुपयांप्रमाणे प्रतिटन दर देण्याचा निर्णय घेतला आहे; पण साखरेचा दर काही वाढला नाही. याला केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे. साखरेच्या दरात घसरण होत असताना सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज होती; पण तसा कोणताही निर्णय घेतला नाही.

यामुळे साखर कारखानदारी टिकवावयाची असेल, तर शासनाला साखर विक्रीचे धोरण बदलावे लागणार आहे. व्यापारी कारणासाठी वापरण्यात येणार्‍या साखरेचा दर वेगळा आणि ग्राहकांना देण्यात येणार्‍या साखरेचा दर वेगळा, असे धोरण राबवले पाहिजे. यासंदर्भात साखर कारखानदारांच्या ‘इस्मा’या संघटनेच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. 
जिल्हा बँकांही अडचणीत येणार

जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांना कर्जपुरवठा केला आहे. शॉर्ट मार्जिनमुळे साखर कारखाने प्रचंड तोट्यामध्ये गेले आहेत. त्याचा परिणाम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीवर होणार असून बँकेतील कारखान्यांची खाती एन.पी.ए.मध्ये जाण्याची शक्यता आहे. यामुळे बँका पुढील हंगामात कारखान्यांना अर्थपुरवठा करू शकणार नाहीत, असे आ. मुश्रीफ यांनी सांगितले.

कागलमध्ये राजा विरुद्ध प्रजा ही लढाई

‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे शुक्रवारी (दि.20) कागलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांना आणणार आहेत, याबाबत आ. मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी, आम्हीही कागलमध्ये 29 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य नेत्यांना या कार्यक्रमासाठी आणण्याचा विचार सुरू आहे; पण कागलमध्ये राजा आणि प्रजा ही लढाई खा. सदाशिवराव मंडलिक असतानापासून सुक्षीं आहे. ते जमिनीच्या 4 तुकड्यांचे वारसदार असतील; पण आम्ही शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत, असेही आ. मुश्रीफ म्हणाले.

 

Tags : kolhapur, kolhapur news,  Hasan Mushrif, Sugar per quintal, Grant,