Mon, Jun 17, 2019 19:09होमपेज › Kolhapur › उतार्‍यात पुढे, दरात मागे

उतार्‍यात पुढे, दरात मागे

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:07AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात साखर उतार्‍यात सहकारी साखर कारखान्यांपेक्षा चार पाऊल पुढे असणारे खासगी साखर कारखाने दर देण्याच्या बाबतीत मात्र सहकारी कारखान्यांपेक्षा एक पाऊल मागेच आहेत. पहिली उचल शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा झाल्यानंतर 3100 रुपयांची सर्वाधिक उचल देणारा बिद्री साखर कारखाना एकमेव ठरला आहे. खासगी कारखान्यांची मजल टनाला 3000 रुपयांपर्यंतच गेली आहे. 

2 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून सरासरी 28 ते 38 दिवसांचा हंगाम आतापर्यंत झाला आहे. साखर उत्पादन आणि उतार्‍यात विभागासह राज्यातही कोल्हापूरनेच बाजी मारली आहे. आता पहिली उचल देण्यातही कोल्हापूरच आघाडीवर आले आहे. उसाचा दर सर्वाधिक देण्याची परंपरा बिद्री सहकारी साखर कारखान्याने कायमच जपली आहे.

यावर्षीदेखील सर्वाधिक पहिली उचल याच कारखान्याने दिली आहे. कारखान्याचा उतारा आजच्या घडीला साडेदहा टक्क्यांपर्यंत असतानाही या कारखान्याने शेतकर्‍यांना सर्वाधिक उचल देण्याची किमया केली आहे. या कारखान्याबरोबरच सहकारातील जवाहर, शाहू, मंडलिक या कारखान्यांनीही अनुक्रमे 3075, 3032, 3075 रुपये प्रतिटन असा दर दिला आहे. डी.वाय., राजाराम यांचा 2900 रुपये प्रतिटनाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व सहकारी साखर कारखान्यांनी 3000 रुपये प्रतिटन दर दिला आहे. 

जिल्ह्यात 23 कारखान्यांपैकी 6 खासगी, तर 3 कारखाने भाडेतत्त्वावर खासगी कारखान्यांकडून चालवले जात आहेत. सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी उतारा 10.21 टक्के असताना खासगी कारखान्यांचा उतारा मात्र 10.53 टक्के राहिला. सहकारी कारखान्यांवर खासगी कारखान्यांनी मात केली; पण हीच परंपरा त्यांनी दराच्या बाबतीत मात्र कायम ठेवली नाही. उतारा कमी असतानाही सहकारातील कारखान्यांनी सर्वाधिक दर दिला आहे. याउलट सर्वाधिक उतार्‍यात अग्रस्थानी असलेल्या खासगी कारखान्यांपैकी एकाही कारखान्याने 3 हजारांच्या वर दर दिलेला नाही.

कारखान्यांनी दिलेली पहिली उचल (कंसात एफआरपी)

शाहू 3032 (2832), राजाराम 2900 (2700), कुंभी 3000 (2882), डी.वाय. 2900 (2790), आजरा 3000 (2430), पंचगंगा 3000 (2764), बिद्री 3100 (2869), सरसेनापती 3000 (2601), हेमरस 2820 (2620), गडहिंग्लज 3000 (2565), मंडलिक 3050 (2720), वारणा 3010 (2910), दत्त शिरोळ 2925 (2825), भोगावती 2912 (2712), इको केन 3000 (2750), गायकवाड 3000 (2800), जवाहर 3075 (2832), दालमिया 3000 (2838).