Wed, Mar 27, 2019 00:01होमपेज › Kolhapur › यापुढील उसास प्रतिटन 2500 रुपये दर

यापुढील उसास प्रतिटन 2500 रुपये दर

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बाजारात साखरेचे दर 3600 रुपयांवरून प्रतिटन 2800 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे जाहीर केलेले दर सध्या शक्य नसल्याने उर्वरित बिले प्रतिटन 2500 रुपयेप्रमाणे देण्याचा निर्णय जिल्हा बँकेत झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला. तर जाहीर केलेल्या दराप्रमाणे राहिलेली रक्‍कम उपलब्धतेनुसार देण्याची ग्वाही साखर कारखानदारांनी दिली असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखानदारांकडून करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, साखर कारखाने सुरू होताना (ऑक्टोबर) साखरेचे दर प्रतिटन 3600 रुपये होते. गळीत हंगाम सुरू झाला, त्यावेळी बहुतांश कारखान्यांनी पहिली बिले जाहीर केलेल्या ऊस दराप्रमाणे अदा केली आहेत. मात्र, तीन महिन्यांनी अचानक साखरेच्या दरात झपाट्याने घसरण झाली आहे. हे दर 3600 रुपयांवरून 2800 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तसेच सध्या साखरेलाही उठाव नाही. कारखान्यांना कर्ज देणार्‍या सर्व बँका साखरेच्या बाजारभावाच्या मूल्यांकनाच्या 15 टक्के मार्जिन मनी वजा जाता प्रतिपोते रक्‍कम उपलब्ध करून देतात. त्यातून कारखान्याने घेतलेल्या कर्जाचे हप्‍ते व व्याज तसेच साखर तयार करण्यासाठी येणरी प्रक्रिया खर्च आणि एफआरपीसाठी घेतलेले मागच्या कर्जाचे हप्‍ते हे सर्व वजा जाता टनास ऊस दरासाठी 1775 रुपयेच उपलब्ध होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 12.50 टक्के आहे. मोलॅसिस, बगॅस, प्रेसमेड इत्यादीचे उत्पादन 2764 रुपये आहे. यातून तोडणी वाहतूक खर्च 600 रुपये वजा जाता 2164 रुपये उपलब्ध होतात. कारखान्यांनी जाहीर केलेले दर व प्रत्यक्ष उपलब्ध होणारी रक्‍कम, यात मोठी तफावत आहे. त्यामुळे बँका उचल दरापेक्षा जादा रक्‍कम उपलब्ध करून देण्यास तयार नाहीत. बँकांनी रक्‍कम दिल्यानंतरच ऊस उत्पादकांना ऊस बिल देणे शक्य होणार आहे. शेतकर्‍यांनी कारखानदारांच्या अडचणी समजावून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीस जिल्हा बँकेचे चेअरमन आ. हसन मुश्रीफ, भोगावतीचे चेअरमन पी. एन. पाटील, जवाहरचे चेअरमन प्रकाश आवाडे, बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील, मंडलिकचे चेअरमन प्रा. संजय मंडलिक, शरदचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे, आजराचे चेअरमन अशोक चराटी, राजारामचे पी. जी. मेढे, वारणाचे व्ही.एस. कोले, संताजी घोरपडेचे दीपक चव्हाण, छत्रपती शाहूचे अमरसिंह घोरपडे तसेच इतरही कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.