Sat, Apr 20, 2019 09:59होमपेज › Kolhapur › साखर कारखाने कारवाईच्या जात्यात

साखर कारखाने कारवाईच्या जात्यात

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:37PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी साखर आयुक्‍तांनी साखर जप्‍तीच्या कारवाईला  सुरुवात  केल्याने आतापर्यंत सुपात असलेले कारखाने आता खर्‍या अर्थाने जात्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, भोगावती, पंचगंगा, रेणुका शुगर्स या तीन कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, आता दुसर्‍या टप्प्यात कोणत्या कारखान्यांवर कारवाई होणार या चिंतेने साखर उद्योजकांची झोप उडाली आहे.

राज्यात सर्वाधिक एफआरपी देणार्‍या जिल्ह्यातील कारखान्यांनी जानेवारीपासून तुटलेल्या उसाचे प्रति टन 500 रुपये थकविल्याने थकीत एफआरपीची रक्‍कम 700 कोटींवर पोहोचली आहे. एफआरपीची रक्‍कम थकविता येत नसल्याने प्रशासकीय कारवाईची भीती नसलेल्या साखर कारखान्यांनी राजकीय वशिलेबाजीच्या जोरावर तीन महिन्यांहून अधिक काळ ही रक्‍कम थकविली आहे. हे एफआरपीच्या कायद्याचा भंग करणारे असल्याने संबंधितांवर फौजदारीसह साखर जप्‍तीची कारवाई करावी, या मागणीसाठी शिरोळच्या आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी थेट साखर आयुक्‍तांकडे पाठपुरावा करीत उपोषणास्त्र हाती घेतले होते. 10 एप्रिलपर्यंत थकीत बिले देण्याची मुदत असताना ती 15 एप्रिलपर्यंत वाढविली. मात्र, कारखान्यांनी एफआरपी जमा न केल्याने कारवाई सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात वारणा, भोगावती व रेणुका शुगर्स या बड्या कारखान्यांवर कारवाईची कुर्‍हाड कोसळली आहे. वारणा कारखान्याची 115 कोटी, रेणुका 62 कोटी, भोगावतीची 51 कोटी थकीत एफआरपी आहे. शिरोळ व बिद्रीने आपली थकीत रक्‍कम काहीअंशी जमा केली आहे, पण अजूनही बिद्रीची थकीत रक्‍कम 6 कोटींची तर दत्त शिरोळची 20 कोटींची आहे. शाहू 12 कोटी, राजाराम 16 कोटी, नलवडे 14 कोटी, जवाहर 25 कोटी, मंडलिक 7 कोटी, कुंभी-कासारी 44 कोटी, शरद 10 कोटी, गायकवाड 14 कोटी, डी. वाय. 12 कोटी, दालमिया 48 कोटी, गुरुदत्त 19 कोटी, इको केन 15 कोटी, घोरपडे 22 कोटी, तांबाळे दीड कोटी रुपये एफआरपीची रक्‍कम थकीत आहे.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Sugar factory, action,